(नवी दिल्ली)
भाजपच्या दोन खासदारांनी संसदेत बोलताना महत्त्वाचे संकेत दिले. यामुळे दोन हजाराची नोट बंद होणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. भारतात 2016 मध्ये नोटबंदी जाहीर झाली आणि थोड्याच वेळात रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आणत असल्याचे जाहीर केले. यानंतर विरोधकांनी नोटबंदीच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले. पण आता भाजपच्या दोन खासदारांनी संसदेत बोलताना महत्त्वाचे विधान केले आहे. यामुळे दोन हजाराची नोट बंद होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आले.
नोटबंदी झाली त्यावेळीच आलेली दोन हजाराची नोट आता देशविरोधी कारवायांसाठी वापरली जात आहे. दहशतवाद, नक्षलवाद, शस्त्र व्यापार आणि अमली पदार्थ व्यापार या सर्व ठिकाणी दोन हजाराच्या नोटेचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. गुन्हेगारी कारवायांमध्ये दोन हजाराच्या नोटेचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याचे चित्र आहे. अनेक भ्रष्ट नेत्यांकडे आढळलेल्या रोख रकमेत दोन हजारांच्या नोटा मोठ्या संख्येने आढळत आहेत. यामुळे देशहितासाठी आणि देशाच्या सुरक्षेसाठी दोन हजाराची नोट बंद होणे आवश्यक आहे, असे भाजपचे खासदार सुशीलकुमार मोदी म्हणाले. ते बिहारमधून भाजपच्या तिकिटावर राज्यसभेवर निवडून आले आहेत. लोकसभेत भाजपचे खासदार निशिकांत दुबे म्हणाले की, ‘मागील 3 वर्षांपासून दोन हजाराच्या नोटांची छपाई बंद आहे. अस्तित्वात असलेल्या दोन हजाराच्या नोटांचा होत असलेला वापर बघता सरकार कधीही या नोटा चलनातून बाद करू शकते.’ भाजपच्या दोन खासदारांच्या संसदेत केलेल्या वक्तव्यानंतर दोन हजाराची नोट बंद होणार असल्याची चर्चा जोरात आहे.
Gradual Phasing out of 2000 currency note pic.twitter.com/AH8xYNiaOP
— Sushil Kumar Modi (मोदी का परिवार ) (@SushilModi) December 12, 2022
नोटबंदी केली त्यावेळी कमी काळात नोटांची अदलाबदली करता यावी आणि चलनातून बाद केलेल्या नोटा आर्थिक व्यवहारांतून बाहेर काढणे सोपे व्हावे यासाठी दोन हजाराची नोट आणण्यात आली. आता ही नोट चलनातून बाद करण्याची आवश्यकता आहे. ज्यांच्याकडे दोन हजाराची नोट आहे त्यांना अदलाबदलीचा पर्याय द्यावा आणि ही नोट कायमची बाद करावी अशी मागणी भाजपचे खासदार सुशीलकुमार मोदी यांनी केली.
जगातील सर्व विकसित देशांमध्ये 100 ही सर्वात मोठी रोख रकमेतील नोट आहे. आपल्याकडे दोन हजाराची नोट ही सर्वात मोठी नोट आहे. भ्रष्टाचार करणाऱ्यांसाठी 2 हजाराच्या नोटेमुळे 2 लाख रुपये एका छोट्या बॅगेतून नेणे सोपे आहे. सरकारला भ्रष्टाचार आणि लाचखोरीला आळा घालायचा असेल तर आता 2 हजाराच्या नोटा चलनातून बाद करणे आवश्यक आहे; असे भाजपचे राज्यसभा खासदार सुशीलकुमार मोदी म्हणाले.
अनेक काँग्रेस नेत्यांनी स्वतःकडे दोन हजाराच्या नोटा साठवून ठेवल्या आहेत. ज्या दिवशी दोन हजाराची नोट बंद होईल त्यावेळी काँग्रेस नेतेच त्रस्त होतील; असेही भाजपचे खासदार निशिकांत दुबे म्हणाले.