(मुंबई)
दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्याने नागरिकांनी त्या बदलण्यासाठी बँकांमध्ये धाव घेतली आहे. याचाच फायदा घेत एक व्यक्ती बनावट नोटा घेऊन बँकेत गेल्याचा प्रकार ताडदेव येथे घडला. नावीद शेख(३३) असे या व्यक्तीचे नाव आहे. बँकेच्या अधिकाऱ्यांनी या नोटा जप्त करून त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी ताडदेव पोलिसांनी गुन्हा नोंदवला.
तक्रारदार हे एका खासगी बँकेच्या ताडदेव येथील शाखेत व्यवस्थापक आहेत. तसेच शेख हा व्यवसायाने सेल्समन आहे. तो मुंब्रा येथील रहिवासी आहे. शेख हा २६ मे रोजी दुपारी ३ च्या सुमारास दोन हजार रुपयांच्या १० नोटा बदलण्यासाठी बँकेत गेला. त्याने अर्ज भरून नोटा बदलण्यासाठी बँकेतील रोखपालाकडे दिल्या. रोखपालाने नोटा तपासल्या असता त्या बनावट असल्याचे लक्षात आले. ही बाब बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना समजताच त्यांनीही तपासणी केली.
बँकेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत ताडदेव पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली. या बनावट नोटांबाबत शेख याच्याकडे चाैकशी केली असता, तो नोकरी करत असलेल्या नागपाड्यातील दुकानाचे मालक इसरार शेख यांनी या नोटा दिल्याचे सांगितले. दरम्यान, याबाबत ताडदेव पोलिस अधिक तपास करत आहे.