(नवी दिल्ली)
नोटाबंदीच्या सुमारे 6 वर्षानंतर केंद्र सरकारकडून चलनी नोटांबाबत माहिती देण्यात आली आहे. सध्या 2 हजार रुपयांचे चलन कमी प्रमाणात दिसत आहे. यासाठी या नोटेची वेगवेगळ्या प्रकारे चर्चा ऐकायला मिळत आहेत. मागील काही वर्षांत या नोटा खूपच कमी झाल्या आहेत. 2 हजारच्या नोटांबाबत रिझर्व्ह बँकेने बँकांना काही आदेश दिले आहेत का? खुद्द अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीच संसदेत याबाबत मोठा खुलासा केला आहे.
आजकाल बँकांच्या एटीएममधून 2 हजार रुपयांऐवजी 500 आणि 200 रुपयांच्याच नोटा बाहेर येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 2 हजार रुपयांच्या नोटा बाजारातून काढून टाकण्याचा सरकारचा विचार आहे का? हा मुद्दा संसदेत उपस्थित करण्यात आला आहे. लोकसभेत खासदार संतोष कुमार यांनी या अनुषंगाने अर्थमंत्र्यांना अनेक प्रश्न विचारले आहेत. याची उत्तरे अर्थमंत्र्यांनी दिली आहे.
निर्मला सीतारामन म्हणाल्या की, आरबीआयच्या वार्षिक अहवालानुसार मार्च 2017 आणि मार्च 2022 अखेर 500 आणि 2 हजार रुपयांच्या नोटांचे एकूण मूल्य 9.512 लाख कोटी आणि 27.057 लाख कोटी होते. रिझर्व्ह बँकेने बँकांना अशा कोणत्याही सूचना दिल्या नाहीत. कोणत्या मूल्याची नोट आणि कधी एटीएममध्ये टाकायची हे बँकेनेच ठरवले आहे. आरबीआयच्या वार्षिक अहवालानुसार 2019-20 सालापासून 2 हजार रुपयांची नोट छापण्यात आलेली नाही, असा खुलासा सीतारामन यांनी केला आहे. त्यामुळे दोन हजाराची नोट बंद होणार या चर्चेला सध्यातरी पूर्णविराम मिळाला आहे.