(देवरूख / सुरेश सप्रे)
संगमेश्वर तालुक्यात मौजे आंबेड खुर्द रेल्वे बोगद्याजवळ असलेल्या निर्जन परिसरात ५६ वर्षीय इसमाचा मृतदेह सापडल्याने मोठी खळबळ उडाली होती. संगमेश्वर तालुक्यात मौजे आंबेड खुर्द, तांबेवाडी रेल्वे बोगदा क्र. २४ कडे जाणाऱ्या पायवाटेवर निर्जनस्थळी हा धक्कादायक प्रकार घडला होता. या ठिकाणी मृतदेह दिसल्याने याची खबर तात्काळ संगमेश्वर पोलिसांना देण्यात आली. मात्र, निर्जनस्थळी मिळालेला या मृतदेह पाहताच यात घातपाताचा संशय पोलिसांनी व्यक्त करत तपासाची चक्रे वेगाने फिरवत या हत्येमागील संशयीतांना अटक करत दोन दिवसातच छडा लावला आहे.
मृतदेहाजवळच पडलेला मोबाईल मिळाल्याने या मोबाईलवरून हा मृतदेह इस्माईल अन्सारी यांचा असल्याचे स्पष्ट झाले होते. यावरून इस्माईल यांचा मुंबईत असलेला मुलगा अरबाज याच्याशी पोलिसांनी संपर्क साधला. यावेळी वडिलांची आदल्या दिवशी रात्री आर्थिक व्यवहारावरून वाद झाल्याची माहिती दिली. त्यामुळे पोलिसांचा संशय आणखीनच बळावला. तसेच वडील घरी न आल्याने त्यांचा शोध घरचे घेत होते. दरम्यान, वडील बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्याच्या तयारीत असतानाच वडिलांच्या मृत्यूची माहिती अरबाजला मिळाली.
अरबांच्या माहितीवरून हत्येचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इस्माईल अन्सारी (वय ५६, रा. कुर्ला, तळेवाडी मुंबई) असं हत्या झालेल्या इसमाचे नाव आहे. इस्माईल हा मुंबई परिसरातून तडीपार होता. त्याच्यावर यापूर्वी गुरांची वाहतूक करणे सह अनेक स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, आर्थिक देवाण घेवाणीच्या कारणावरून ही हत्या झाल्याचं समोर आलं आहे.
इस्माईल आणि संशयित आरोपी हे एकमेकांना चांगले ओळखत होते. संशयित आरोपी आणि इस्माईल यांच्याच आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून झालेल्या वादातूनच ही हत्या झाली आहे. रेल्वे ट्रॅकजवळ पडलेल्या एका लोखंडी पाईपच्या साह्याने डोक्यावर मारहाण करून दुखापत करून इस्माईलची हत्या केली, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
या सगळ्या प्रकरणाची तक्रार आरबाज महमद साजिद अन्सारी (वय २४, रा. लाल बहादुर शास्त्री रोड, कुर्ला कोर्टाजवळ, कुर्ला (प), मुंबई) याने संगमेश्वर पोलीस ठाण्यात दिली आहे. मुंबई परिसरातून तडीपार असलेला इस्माईल याचे नातेवाईक संगमेश्वर देवरुख परिसरात असतात त्यांच्याकडे तो आला होता. या खून प्रकरणी सागर संतोष मोहिते, (२३), सनी संतोष मोहिते (२१) दोन्ही रा. संभाजीनगर. संगमेश्वर, वअक्षय राजु साळवे (वय २५, रा. लोकमान्य नगर पाडा नं १ आकृती रेंटल रूम नं १६०२ वर्तकनगर बेस्ट ठाणे) या तिघांनाही संगमेश्वर पोलिसांनी अटक केली असून त्यांना न्यायालयाने ४ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गावित करत आहे.
.