(रत्नागिरी)
शहरात जिल्हा परिषद कार्यालयाच्या मार्गावर असलेल्या अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये जोरदार राडा झाला. एक तरुणी आणि तिचे आई-वडील घरात राहतात. त्यांच्या घरात घुसून मारहाण करण्याचा प्रकार घडला. शहर पोलिस ठाण्यात परस्पर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना शनिवारी (दिनांक २८ ऑक्टोबर २०२३) दुपारी दोनच्या सुमारास जिल्हा परिषदेजवळील अपार्टमेंटमध्ये घडली. या मारहाणीत तरुणी जखमी झाली आहे. ती तरुणी आणि तिचे आई-वडील घरी होते. यावेळी संशयित दांम्पत्याने त्यांच्या घरात घुसून तरुणीच्या वडिलांना तू माझ्या मुलाला किडनॅप करतोस का, असे सांगून तरुणीच्या वडिलांशी जोरदार वादावादी केली. तसेच तरुणीच्या अंगावर धावून गेले आणि हाताच्या नखांनी गळ्याजवळ ओरबाडले. तसेच तरुणीचे डोके भिंतीवर आपटले. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.