(कर्जत)
राष्ट्रवादी पक्षातील दोन प्रतिस्पर्धी गट लवकरच येतील हा गैरसमज आहे आणि अशी कोणतीही शक्यता नाही, असे सांगत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी या विषयाला बगल दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन दिवसीय संमेलनात बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी असा दावा केला की, भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीशी हातमिळवणी करण्याच्या अजित पवारांच्या निर्णयाला पक्षातील बहुसंख्य लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही लोक आम्ही पुन्हा एकत्र येत आहोत, असा संभ्रम निर्माण करून लोकांची दिशाभूल करीत आहेत. मला स्पष्टपणे सांगायचे आहे की, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी राष्ट्रवादीत काम करीत आहोत, असेही पटेल म्हणाले.
निवडणूक आयोगासमोर पक्षाचे नाव आणि चिन्ह या दोन गटांमधील वादाबद्दल पटेल म्हणाले की, अजित पवार गटाने आवश्यक पुरावे सादर केले आहेत आणि जेव्हा संधी मिळेल तेव्हा ते आपले म्हणणे मांडतील. सध्याच्या ओबीसी आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण मिळू नये, असे विधान केल्याने राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका होत असल्याबद्दल ते म्हणाले की, भुजबळांनी मराठा आरक्षणाच्या मागणीला कधीही विरोध केलेला नाही. तसेच राष्ट्रवादी पक्षातील दोन प्रतिस्पर्धी गट लवकरच येतील हा गैरसमज आहे आणि याची सुतराम शक्यता नाही याचा पुर्नारुच्चार त्यांनी केला.
भाजपा आणि शिवसेनेबरोबर २००४ मध्येच आपली युती होणार होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तेव्हा जन्माला आला होता. त्यावेळच्या लोकसभा निवडणुकीसाठी तिन्ही पक्षांचा १६-१६-१६ असा फॉर्म्युलाही ठरला होता. भाजपा-शिवसेनेबरोबर युतीत लोकसभा निवडणूक लढायची आणि सरकारमध्ये सामील व्हायचे, असे ठरले होते. यासाठी माझ्या दिल्लीतल्या घरात दिवंगत भाजपा नेते प्रमोद महाजन यांच्यासह भाजपा आणि राष्ट्रवादीतल्या मोठ्या नेत्यांची चर्चा झाली होती. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, जसवंत सिंह या तिघांच्या सूचनेप्रमाणे बैठक झाली. मात्र, प्रमोद महाजन यांच्यामुळे ही युती होऊ शकली नाही, असा गौप्यस्फोट अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केला.
खरे तर माझ्या घरी झालेल्या बैठकीनंतर दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे खुश होते. परंतु त्यांना या सगळ््या घडामोडींमध्ये फारसे सहभागी करून घेतले नव्हते. दुस-या बाजूला प्रमोद महाजन यांना ही युती नको होती. कारण त्यांना वाटत होते की या युतीमुळे त्यांचे दिल्लीतील महत्त्व कमी होईल. महाजन यांना वाटत होतं की, आज मी दिल्लीत महाराष्ट्रातला निर्विवादपणे मोठा नेता आहे. परंतु शरद पवार आपल्याबरोबर आले तर आपले दिल्लीतील पक्षश्रेष्ठी पवारांचेच जास्त ऐकतील. त्यामुळे प्रमोद महाजन यांनी बाळासाहेब ठाकरे यांना बैठकीची बातमी सांगितली. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी राष्ट्रवादीवर, शरद पवारांवर आडवी तिडवी टीका केली आणि २००४ ला भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीची होणारी युती फिस्कटली. हे कोणालाही माहिती नसेल. हे मी आज पहिल्यांदाच जाहीरपणे सांगत आहे, असे पटेल म्हणाले.