( पालघर )
देशाचा ७५ वा स्वातंत्र्य दिन सर्वत्र उत्साहात साजरा होत असताना दुसरीकडे मोखाडा येथे दु:खद घटना समोर आली आहे. मोखाड्यातील अतिदुर्गम बोटोशी ग्रामपंचायतीमधील मरकटवाडी येथील वंदना बुधर (२७) या गर्भवती महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला होता; परंतु आरोग्य सेवा उपलब्ध नसल्याने या महिलेला जुळया बालकांचा मृत्यू डोळ्यादेखत पहावा लागला. प्रसूतीनंतर आरोग्य सेवा मिळविण्यासाठी तीन किलोमीटर डोलीतून दवाखाना गाठावा लागल्याची घटना समोर आली आहे. बोटोशी ग्रामपंचायतीमधील मरकटवाडी येथील वंदना बुधर (२७) यांना शनिवारी 13 ऑगस्ट रोजी प्रसूती वेदना होऊ लागल्या. त्यांची घरीच प्रसुती झाली. त्यांनी जुळ्या बालकांना जन्म दिला. या बालकांना तातडीने उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला. आपल्या डोळ्यासमोर वंदना यांना आपल्या मुलांचा मृत्यू पाहावा लागला. दुर्गम भागात आरोग्य सेवा उपलब्ध नसल्याने तीन किलोमीटर डोलीतून पायपीट करत दवाखाना गाठावा लागला.
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात रस्ते, वीज, पाणी आणि आरोग्य या सारख्या प्राथमिक सुविधा आदिवासींना मिळालेल्या नाहीत. आजही येथील आदिवासींना रस्त्याअभावी डोली करून पायपीट करत दवाखान्यात जावे लागते. वेळेत आरोग्य सेवा न मिळाल्याने दरवर्षी अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. या भागाला रस्ता नसल्याने महिनाभरात डोली करून रूग्णांना दवाखान्यात दाखल करण्याच्या पाच घटना घडल्या आहेत.