देशातील पाच राज्यांत पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचारानं वेग घेतला आहे. भाजप व काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी प्रचाराची राळ उडवून दिली आहे. काँग्रेसकडून राहुल गांधी व प्रियांका गांधी तर, भाजपकडून जे. पी. नड्डा व अमित शहा यांनी सूत्रं हाती घेतली आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी जोरदार भाषणं ठोकली जात आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या एका भाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या भाषणावरून काँग्रेसनं अमित शहा, नरेंद्र मोदी व भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मित शहा यांनी छत्तीसगड येथील सभेत केलेल्या भाषणात काँग्रेसच्या कारभारावर जोरदार टीका केली. काँग्रेसची निष्क्रियता सांगताना भाजपनं केलेल्या कामांचे दाखलेही शहा यांनी दिले. त्यावेळी त्यांनी काही दावेही केले. ‘एनआयटी, आयआयटी, आयआयआयटी, आयआयएम, एम्स आणि लाइवलीहूड कॉलेज या सगळ्या शैक्षणिक संस्था देशात सर्वप्रथम भारतीय जनता पक्षानं उभ्या केल्या आहेत, असं शहा यावेळी आपल्या भाषणात म्हणाले. ह्या दाव्यानंतर ते टीकेच्या रडारवर आले आहेत.
काँग्रेसनं आपल्या एक्स अकाऊंटवरून शहा यांच्या दाव्याची खिल्ली उडवली आहे. भाजपच्या लोकांनी खोटं बोलण्याचे सगळे रेकॉर्ड मोडून टाकले आहेत. भाजपचा जन्मही झाला नव्हता. अमित शहा यांच्या पक्षाची स्थापनाही झाली नव्हती तेव्हा देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशात आयआयटी, आयआयएम आणि एम्सची स्थापना केली होती, असं सांगत काँग्रेसनं तारखांसह या सगळ्याचे पुरावेच सादर केले आहेत. आगामी पाच राज्यातील निवडणुकांमध्ये भाजपचा सुपडा साफ होणार आहे हे पंतप्रधान मोदी व शहांना कळून चुकलं आहे. त्यामुळं ते मनाला वाट्टेल ते बोलत सुटले आहेत. मात्र देश या खोट्या प्रचाराला बळी पडणार नाही, असं काँग्रेसनं म्हटलं आहे.
BJP ने झूठ बोलने में सारे रिकॉर्ड तोड़ दिए हैं। pic.twitter.com/QlRprJlYQl
— Congress (@INCIndia) October 17, 2023