(रत्नागिरी)
जिल्हयात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांच्या मी संपर्कात आहे. आम्ही देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व मानतो. ते भाजपासाठी महाराष्ट्रात जो निर्णय घेतील, तो आम्हाला बंधनकारक आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांना जो निधी पाहिजे तो देण्याचा माझा प्रयत्न आहे. कमिट्यांवरही त्यांना घेतले आहे. मी भाजपला पालकमंत्री म्हणून बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
रत्नागिरीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. रत्नागिरीत भाजपाच्या सर्व पदाधिकारी व नेत्यांच्या मी संपर्कात असून, त्यांच्याशी विकास कामांबाबतही चर्चा करीत आहे. रत्नागिरी सोडल्यास अगदी ठाण्यापासून अनेक पदाधिकारी संपर्कात आहेत. रत्नागिरीचे संपर्कमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशीही आपण चर्चा करीत असतो. माजी आमदार व भाजपाचे विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष बाळ माने यांचाही मतदार संघात मोठा आवाका आहे. एक चांगली संस्था ते चालवतात. काही समज-गैरसमज असतात ते दूर होत असतात, असे ना. सामंत यांनी बाळ मानेंबाबत बोलताना सांगितले.
आपला संपर्क नेहमीच तळागाळातील जनतेशी असतो, त्यामुळे कोण काय बोलत याकडे मी लक्ष देत नाही. आपण जनतेशी बांधील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.