(संगमेश्वर)
तालुक्यातील साखरपा नजीकच्या पुर्येतर्फे देवळे गावाच्या विद्यमान सरपंच साक्षी गोरूले यांनी राजीनामा दिला आहे. उपसरपंच संजीव लोटणकर यांची प्रभारी सरपंच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुर्येतर्फे देवळे गावाच्या सरपंच गोरूले यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागी विद्यमान उपसरपंच संजीव लोटणकर यांची प्रभारी सरपंच म्हणून नियुक्ती करण्यात आली.
लोटणकर हे उपसरपंचपदी काम करत असताना त्यांनी गावाच्या विविध कामांसाठी ५३ लाखाचा निधी उपलब्ध करून घेतला. त्यामध्ये प्रामुख्याने धनगरवाडी रस्ता, गंगादेवी कॉजवे, तुळजापूरवाडी रस्ता, गवळीवाडी पाखाडी, जांभवाडी रस्ता तसेच स्वखर्चातून बोरवेल पंप देऊन पाणीसमस्या दूर करण्यासाठी हातभार लावला. पुर्ये गावाला जलयुक्त शिवार योजनेत समाविष्ट करून घेतले तसेच आपल्याला मिळालेल्या मानधनाचे गरजू महिलांना वाटप केले. यापुढे आपणास मिळालेल्या संधीचे गावविकासासाठी सोने करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.