( रत्नागिरी )
देवरूख (ता. संगमेश्वर) येथे आईचा खून करून पाण्याच्या टाकीत मृतदेह टाकल्याचा आरोप असलेल्या मुलाचा जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला. दीपक दत्तात्रय संसारे (वय ४२, रा. क्रांतिनगर, देवरूख) असे संशयित तरुणाचे नाव आहे. ही घटना ३१ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत घड़ली होती. संशयिताने दागिन्यांच्या हव्यासापोटी आईचा खून केला. या प्रकरणी देवरूख पोलिसांनी संशयितावर खूनाचा गुन्हा दाखल करुन अटक केली होती. रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी दीपकच्या जामिनावर निकाल दिला. सरकारी पक्षातर्फे अॅड. वर्षा प्रभू यांनी काम पाहिले.
खटल्यातील माहितीनुसार देवरूख-क्रांतिनगर येथे एका रहिवासी इमारतीमध्ये पाण्याच्या टाकीत शारदा दत्तात्रय संसारे (वय ८०) यांचा मृतदेह आढळून आला होता. याबाबत मुलगा दीपक संसारे याने देवरूख पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास करत मुलावर खुनाचा गुन्हा दाखल केला होता.
…अन् फेटाळला जामीन
या संबंधी निकाल देताना न्यायालयाने म्हटले की, दोषारोपपत्र दाखल केलं याचा अर्थ तपास पूर्ण झाला, असा होत नाही. अन्वेषण अधिकाऱ्यांच्या यांच्या म्हणण्यानुसार आरोपी व मृत गुन्ह्याच्यावेळी दोघेच घरात होते. गुन्ह्यासंबंधी अजून काही महत्वपूर्ण तपास करण्याचा असल्याचे अन्वेषण अधिकाऱ्याने सांगितले असून तपास अद्याप पूर्ण झाला नसल्याचेच स्पष्ट होत आहे, असे नोंदवत न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला.