(देवरूख)
संंगमेश्वर तालुक्यातील देवरूख येथील विजय प्रतिष्ठान सामाजिक संस्थेचे सल्लागार प्रदीपजी मांडवकर यांच्या वाढदिवसानिमित्त संस्थेमार्फत देवरूख कांगणेवाडी शाळेला आज शनिवारी ऐतिहासिक पुस्तके भेट स्वरूपात देण्यात आली. तसेच सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला. येत्या २६ जानेवारी २०२४ रोजी प्रजासत्ताक दिनी कांगणेवाडी शाळेला संस्थेकडून २५ खुर्च्या देणगी स्वरूपात देणार असल्याचे विजय प्रतिष्ठानचे अध्यक्ष नागेश कदम यांनी आपल्या भाषणात सांगितले.
विजय प्रतिष्ठान या संस्थेमार्फत सामाजिक बांधीलकी जपली जात असून या सामाजिक बांधीलकीच्या भावनेतून संस्थेने आजपर्यंत शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्यावाटप, गरीब शालेय विद्यार्थ्यांना मोफत एसटी पास, गोरगरीब विद्यार्थ्यांना शाळेच्या फीसाठी आर्थिक मदत केली आहे. तसेच स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला असून कबड्डी स्पर्धा व चिखलणी-नांगरणी स्पर्धाही घेतली आहे. या संस्थेमार्फत विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. त्यामुळे या संस्थेने समाजात आपली चांगली प्रतिमा निर्माण केली आहे. संस्थेचे अध्यक्ष नागेश कदम हे सर्व पदाधिकारी व सभासदांना सोबत घेऊन संस्थेचे कार्य पुढे नेत आहेत. त्यांना पदाधिकारी व सभासदांची चांगली साथ लाभत आहे.
या विजय प्रतिष्ठान सामाजिक संस्थेमार्फत आज शनिवारी देवरुख कांगणेवाडी शाळेमध्ये ऐतिहासिक पुस्तके भेट स्वरूपात देण्यात आली. तसेच सर्व मुलांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष नागेश कदम, सचिव महेंद्र कांगणे, सल्लागार प्रदीपजी मांडवकर, दिव्यांग सल्लागार महेंद्रजी कांगणे, जनसंपर्क प्रमुख राज कदम व सोबत गुरव तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. वाजे मॅडम, शिक्षक श्री. टक्के सर, शिक्षक श्री. देवरुखकर सर, शिक्षिका सौ. वेतोस्कर मॅडम सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
यावेळी बोलताना विजय प्रतिष्ठानचे अध्यक्ष नागेश कदम यांनी संस्थेच्या वाटचालीविषयी माहिती दिली. तसेच त्यांनी आपल्या भाषणामध्ये शाळेसाठी २६ जानेवारी २०२४ रोजी २५ खुर्च्या देणगी स्वरूपात देणार असल्याचे सांगितले. शाळेसाठी पुढील काळात सतत सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. तर शाळेला ऐतिहासिक पुस्तके भेट स्वरूपात दिल्याबद्दल मुख्याध्यापिका वाजे मँडम यांनी विजय प्रतिष्ठान या संस्थेचे आभार मानले. संस्थेचे सल्लागार प्रदीपजी मांडवकर यांच्या वाढदिवसानिमित्त संस्थेने हा स्तुत्य उपक्रम राबवला. प्रदीप मांडवकर यांचा २०१९ मध्ये मोठा अपघात झाला होता. या अपघातातून ते सुखरुप बचावले. मात्र त्यांच्या पायाला जबर मार लागल्याने त्यांच्या पायावर दोनदा आँपरेशन करावे लागले. या प्रसंगानंतरही संस्थेवरील प्रेमापोटी ते संस्थेच्या उपक्रमांमध्ये अगदी पुर्वीच्या उमेदीनेच सहभागी होत असतात. संस्थेसाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतले असल्याचे संस्थेचे अध्यक्ष नागेश कदम यांनी आवर्जून सांगितले.