(संंगमेश्वर / प्रतिनिधी)
तालुक्यातील देवरुख-संगमेश्वर-साखरपा रस्त्याची दुरावस्था मागील दोन वर्षात झाली आहे. तीन वर्षांपूर्वी लोकांच्या सेवेत दाखल झालेल्या या नव्या रस्त्याची सध्याची स्थिती पाहता येणाऱ्या काळात अजून खराब होण्याची शक्यता आहे. या रस्त्याला ५ वर्षाची हमी असताना सुद्धा रस्ता खराब झाला आहे. परिणामी गॅरंटी अंतर्गत हा रस्ता संपूर्णतः दुरुस्त करावा या मागणीसाठी गावविकास समितीचे जिल्हाध्यक्ष श्यामकर्ण भोपळकर यांच्या नेतृत्वाखाली २६ जानेवारी रोजी साडवली येथे धरणे आंदोलन होणार आहे.
याबाबतचे लेखी निवेदन गावविकास समितीचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्यामकर्ण भोपळकर यांनी देवरुख तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभाग देवरुख व देवरुख पोलीस यांना दिले आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी वरचा थर खराब झाला असून गॅरेंटी अंतर्गत हा रस्ता पूर्णतः दुरुस्त करून घ्यावा. संबंधित ठेकेदाराला याबाबत सूचना द्याव्यात. या रस्त्याची डांबर इतक्या लवकर कशी उडाली याची चौकशी करण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन गाव विकास समितीच्या माध्यमातून होणार आहे.
संगमेश्वर तालुक्यातील हा मुख्य रहदारीचा रस्ता असल्याने या रस्त्याच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी व या रस्त्याला असलेल्या गॅरंटी अंतर्गत सदर रस्त्याचे काम होण्यासाठी दिनांक २६ जानेवारी रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत साडवली सह्याद्रीनगर येथे गावविकास समितीच्या माध्यमातून लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती श्यामकर्ण भोपळकर यांनी दिली आहे. जर रस्त्याला पाच वर्षाची गॅरंटी आहे तर त्याच गॅरंटी अंतर्गत संपूर्ण रस्ता दुरुस्त करून देण्यात यावा अशी मागणी गावविकास समितीची असल्याचे श्यामकर्ण भोपळकर यांनी सांगितले. खराब दर्जाचे काम झाले असल्यास यासंदर्भात चौकशी करावी, असेही भोपळकर यांनी म्हटले आहे.