(देवरूख / प्रतिनिधी)
महिला व बालविकास विभाग, व देवरूख शिक्षण प्रसारक मंडळ, देवरुख यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण’ या कार्यक्रम देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या स्व.डॉ.आपटे क्रीडा संकुल येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला मंडळाच्या उपाध्यक्षा सौ. नेहा जोशी. ॲड. वेदा प्रभुदेसाई, महिला व बाल विकास तालुकाअधिकारी लहू पगडे, प्रकल्प अधिकारी सौ. वंदना यादव. भारतीय स्त्री शक्तीच्या सौ. नयन शिंदे, देवरुख पोलीस स्टेशनच्या सौ. जान्हवी कांगणे, स्वसंरक्षण प्रशिक्षक
राहुल चव्हाण. विद्यार्थी निधी ट्रस्टचे सोहम प्रभुदेसाई व श्रावणी राजवाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
बालकल्याण विभागाचे अधिकारी लहू पगडे यांनी राजमाता जिजाऊ संरक्षण व प्रशिक्षण कार्यक्रम बहुतांश शाळा महाविद्यालयांमध्ये राबविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. स्वतःच्या घरात असणाऱ्या एखाद्या विशेष कार्यक्रमापासून ते आपण आज काय खातोय, कुठे जातोय, काय करतोय याबद्दलची माहिती पोस्टच्या नावाखाली सोशल मीडियावर टाकली जाते. हॅकर किंवा अन्य मंडळी याचाच फायदा घेतात व मुलींना आपल्या जाळ्यात अडकवतात. याविषयी मार्गदर्शन करताना व मुलींनी बदलत्या काळात स्वसंरक्षण कसे करावे, धोके कसे ओळखावे, जागरूक कसे राहावे, मन आणि मनगटाच्या जोरावर स्वतः सिद्ध होणे कसे गरजेचे आहे याबाबत सौ. नयन शिंदे, सौ. वंदना पवार व महिला व बालकल्याण पर्यवेक्षिका सौ. उषा पवार यांनी समुपदेशन केले.
वर्तमान काळामध्ये युवतींच्या समोर असलेली आव्हाने व त्यासंदर्भात घ्यावयाची खबरदारी त्याचबरोबर शासन व विविध सामाजिक संस्था यांच्याकडून केली जाणारी उपाययोजना याबाबत सौ. नेहा जोशी यांनी मार्गदर्शन केले. या उपक्रमांतर्गत ८६०विद्यार्थिनींना प्रात्यक्षिकासह स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ. सीमा शेट्ये यांनी तर आभार डॉ. वर्षा फाटक यांनी मानले.