( देवरुख )
शहरातील गजबजलेल्या ठिकाणी क्रांतीनगर येथे महिलेचा खून झाल्याची घटना समोर आली आहे. एका अपार्टमेंट मधील टेरेसवरील पाण्याच्या टाकीत मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. परिसरात उलट सुलट चर्चा रंगत आहे. शारदा दत्तात्रय संसारे (८०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शारदा संसारे या क्रंतीनगर येथे मुलगा दिपक संसारे याच्यासोबत राहतात. सोमवार 1 नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता दिपक संसारे हे कामासाठी घराबाहेर गेले होते. दुपारी दिपक संसारे हे घरी आले असता फ्लॅटचे कुलुप लॉक केलेल्या स्थितीत दिसले. त्यानंतर त्यांनी आपल्या आईचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र ठावठिकाणा लागला नाही. यामुळे दिपक संसारे यांनी कुलुप तोडले. मात्र घरात आई दिसून आली नाही. त्यांनी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. मात्र सोमवारी दीपक यांना रात्री बाथरुममध्ये हातपाय धुवायला गेल्यावर लाल रंगाचे मिश्रित पाणी नळातुन आलेले दिसले.
दिपक संसारे यांनी सहकार्याच्या मदतीने लगेच टेरेसवर धाव घेतली व पाण्याच्या टाकीत दिपक यांना साडी दिसुन आली. यावेळी आईच्या कपाळावर जखम दिसुन आली व अंगावरील दागिने चोरुन नेल्याचे दिसुन आले. यामध्ये हातातील पाटल्या, गळ्यातली माळ व कानातील कुडी गायब झाल्याचे निदर्शनास आले. अंगावरील दागिन्यांच्या चोरीसाठी हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज देवरुख पोलीसांनी व्यक्त केला.
दिपक संसारे यांनी देवरुख पोलीसांना ही बाब कळवली. देवरुख पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव यांनी सहकार्यांसह घटनास्थळी धाव घेतली व तपासाची सुत्रे वेगाने हलवली. मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला. रत्नागिरी पोलीस उपविभागिय अधिकारी सदाशिव वाघमारे यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. आज सकाळी घटनास्थळी ठसे तज्ञ, श्वानपथक व फाॅरेन्सिक लॅब तज्ञ दाखल झाले व तपास सुरु केला.श्वान बिल्डिंग परिसरातच घुटमळला. अज्ञाताविरुद्घ भा.द.वी.क. ३०२, २०१, ३९४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.