(संगमेश्वर / प्रतिनिधी)
देवरुख कला महाविद्यालयात कलामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यानिमित्ताने चित्रकार शशिकांत बने यांच्या चित्रांचे प्रदर्शन प्रात्यक्षिक , चर्चासत्र आणि चित्रकला स्पर्धांचे देखील आयोजन केले असल्याची माहिती डिकॅड देवरुखचे प्राचार्य रणजित मराठे यांनी दिली .
चित्रकार शशिकांत बने यांच्या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन १७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वा . आमदार शेखर निकम यांच्या हस्ते करण्यात येणार आहे . यावेळी तहसिलदार अमृता साबळे , क्रेडारचे सचिव विजय विरकर आदि मान्यवर उपस्थित रहाणार आहेत . १७ डिसेंबर पासून हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य पहाण्यासाठी खुले असणार आहे . २१ डिसेंबर रोजी १० ते १ आणि २ ते ६ या वेळेत मुंबई येथिल चित्रकार अनिल नाईक यांच्या चित्र प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले आहे . १९ डिसेंबर रोजी तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धा संपन्न होणार आहेत . २३ डिसेंबर रोजी चित्रकार रवी मंडलिक यांच्या चित्र प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले आहे . या कलामहोत्सवासाठी तालुक्यासह जिल्ह्यातील कलारसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन देवरुख कला महाविद्यालयाचे प्राचार्य रणजित मराठे यांनी केले आहे .
चित्रकार शशी बने यांची कर्मभूमी जरी मुंबई असली , तरी जन्मभूमी देवरुख जवळील साडवली सह्याद्रीनगर ही आहे . कोल्हापूर , मुंबई येथे उच्च कलाशिक्षण घेताना कोल्हापूर येथील नामवंत कलाकारांच्या शैलीची भुरळ बने यांना पडली . यातून स्वतःची स्वतंत्र शैली तयार करण्याचा त्यांनी चंगच बांधला आणि त्यामध्ये बने यशस्वी देखील झाले . आपल्या कलाप्रवासात कोल्हापूर येथील नामवंत कलाकारांच्या शैलीचा खूप मोठा प्रभाव असल्याचे बने आवर्जून नमूद करतात .
चित्रकार शशी बने यांनी मुंबई , पुणे , कोल्हापूर , मंगलोर , बंगलोर , कोलकाता आदि ठिकाणी आजवर वैयक्तिक अशी २४ वेळा प्रदर्शने भरवली आहेत . तर देश विदेशात २३ वेळा ग्रूप शो केले आहेत . देश विदेशातील ५० पेक्षा अधिक मान्यवरांकडे शशी बने यांच्या चित्रांचा संग्रह आहे . बने यांनी एकूण सहा ठिकाणी अप्रतिम अशी म्युरल साकारली असून साडवली फार्मसी कॉलेज मध्ये त्यांचे एक म्युरल पहायला मिळते .