(देवरूख/प्रतिनिधी)
कोरोना काळानंतर आता बेकारीची संख्या वाढत चाललेली आहे. याचा परिणाम म्हणजे आता चोरी लुटमारीचे प्रकार वाढीस लागले आहेत. देवरुख बस स्थानकात बुधवार 21 सप्टेंबर रोजी सोनवडे येथील निकिता सनगरे ही विद्यार्थिनी क्लास आटोपून बसने घरी जात होती. यावेळी बसमध्ये प्रवेश करताना एका महिलेने विद्यार्थिनीच्या गळ्यातील चेन हिसकावली. चेन खेचून महिलेने तिथून पळ काढला. मात्र विद्यार्थिनी निकिता हिने पळणाऱ्या महिलेला धावत जाऊन पकडले. अनघा जोशी असे चोरी करणाऱ्या महिलेचे नाव आहे. हा प्रकार प्रवाशांच्या लक्षात येताच प्रवाशांनी निकिताला साथ दिली. तेथून त्या महिलेला पोलिस स्थानकात आणण्यात आले.
निकिताने दिलेल्या फिर्यादीनुसार अनघा जोशी या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला. तिने आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. दरम्यान याच महिलेने 29 जुलै रोजी ही काटवली येथील दुसऱ्या एका विद्यार्थिनीची 10 ग्रॅम वजनाची चेन चोरली होती. त्याची ही कबुली या महिलेने दिली.
पोलिसांनी या महिलेवर गुन्हा दाखल करून अनघा जोशी या महिलेला देवरूख न्यायालयात हजर केले. न्यायालयाने या महिलेला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
याच महिलेवर यापूर्वी लांजा पोलिस स्थानकात चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. तिथे गुन्हा सिद्ध झाल्याने एक वर्षाची शिक्षाही या महिलेने भोगली आहे. मात्र तरीही या महिलेने सुधारणा झालेली नाही.