(संगमेश्वर)
तालुक्यातील देवरुख शहराची ग्रामदेवता ४४ खेड्यांची मालकीण असलेल्या श्री देवी सोळजाई मातेची प्रसिद्ध लोटांगण यात्रा बुधवारी भक्तांच्या अलोट गर्दीत झाली. परिसरातील १९ भक्तांनी सोळजाई देवी मंदिरासमोरील अंगणात लोटांगणे घालून आपले नवस फेडून यात्रा केली.
नवसाला पावणारी अशी या सोळजाई देवीची ख्याती आहे. देवदिवाळीनिमित्त प्रतिवर्षी सोळजाई देवीची लोटांगण यात्रा साजरी केली जाते. यात्रेच्या दिवशी सकाळी पुजारी गुरव, शेट्ये, मानकरी पर्शराम गावकर कुमकर व भक्तांच्या उपस्थितीत सोळजाई देवीचे यथासांग पूजन करून देवीला रूपे लावण्याचा धार्मिक कार्यक्रम झाला.
यानंतर सोळजाई देवीच्या प्रसिद्ध लोटांगण यात्रेला दुपारी ३.३० वाजल्यापासून प्रारंभ झाला. यामध्ये देवीच्या परिसरातील १९ भक्तांनी सोळजाई देवीच्या मंदिरासमोरील अंगणात लोटांगणे घालून आपले नवस फेडले. या लोटांगण यात्रेमध्ये नवस फेडण्यासाठी सोळजाई देवी मंदिरासमोरील अंगणात प्रदक्षिणेच्या रुपात ही लोटांगणे घातली गेली. पाच फेऱ्यांमध्ये लोटांगणाचा धार्मिक कार्यक्रम झाला.
मातेचा गजर व अभंगांची आळवण करत लोटांगण कार्यक्रम झाला. कार्यक्रमाला सुरूवात झाल्यानंतर मंदिर परिसरात मोठी यात्रा भरली. लोटांगण पार पडल्यावर देवी समोरील चौखांबा येथे दिवसभर गावातून आलेले नेवैद्य यांचा प्रसाद देवीला अर्पण करण्यात आला. यानंतर एकत्र देवीला गाऱ्हाणे घालण्यात आले. यानंतर यात्रोत्सवाची सांगता करण्यात आली.