(संगमेश्वर / प्रतिनिधी)
तुमचे अकाउंट अपडेट नसल्यामुळे ब्लॉक केलं जाणार आहे. आपण ताबडतोब अपडेट करुन घ्या. असे सांगून ओटीपी मागून प्रौढाला 2 लाख 22 हजार 258 रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार देवरुख मधलीआळी येथे समोर आला आहे. अज्ञातावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची फिर्याद सचिन गद्रे (51, रा. मधलीआळी, देवरुख, संगमेश्वर) यांनी देवरुख पोलीस स्थानकात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन गद्रे यांना 1 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6.30 वा. च्या सुमारास अनोळखी नंबरवरुन कॉल आला. समोरच्या व्यक्तीने गद्रे यांच्या मोबाईलवर मेसेज टाकला आपला एसबीआय बँकेचे अकाउंट बंद अपडेट नसल्यामुळे बंद होणार आहे. यामुळे घाबरलेल्या गद्रे यांना समोरील व्यक्तीने लगेच पर्याय दिला. तुम्हाला टाकलेल्या मेसेजवर एक लिंक दिली आहे ती ओपन करा असे सांगितले. त्यांनी लिंक ओपन करताच समोरील व्यक्तीने युजर नेम व पासवर्ड तयार करुन लॉगिन केले.
यावेळी गद्रे यांना एक ओटीपी आला. तो त्याने मागून घेतला आणि गद्रे यांच्या स्टेट बँक खात्यातून 24 हजार 96 रुपये गायब झाले. त्यानंतर अर्धा तासाने पुन्हा दीपक शर्मा नावाने एक फोन आला त्याने हिंदीतून बोलत तुमचे पैसे रिफंड करतो असे सांगितले. यावेळी त्याने गद्रे यांना योनो क्वीकसपोर्ट हे अॅप डाउनलोड करायला सांगितले. त्याप्रमाणे गद्रे यांनी अॅप डाउनलोड केले. यावेळी दीपक शर्मा व्यक्तीने पुन्हा त्यांच्याकडून आयडी नंबर आणि पासवर्ड मागून घेतला. गद्रे यांनी तोही दिला. त्यानंतर शर्मा याने योनो क्वीकसपोर्ट अॅपवरील अलॉव येथे क्लीक करण्यास सांगितले. यावेळी गद्रे यांनी दोन वेळा क्लिक केल. एकदा क्लिक केले तेव्हा 98 हजार 639 गेले, दुस़र्यावेळी क्लिक केले तेव्हा 98 हजार 653 असे एकूण 2 लाख 22 हजार 258 रुपये काही वेळातच गायब झाले.
आपले पैसे खात्यातून जाताहेत कसे हे कळल्यावर गद्रे गोंधळले. त्यानंतर त्यांनी सगळी रक्कम चेक केली तर 2 लाखांपेक्षा जास्तचा चुना आपल्याला लावल्याचे लक्षात येताच त्यांनी देवरुख पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी दीपक शर्मा या व्यक्तीवर भादविकलम 420, 419 माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66 (क), (ड) प्रमाणे गुन्हा दाखल केला. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव करत आहेत.