( संगमेश्वर / प्रतिनिधी )
संगमेश्वर तालुक्यातील जि.प. आदर्श शाळा तळवडे तर्फे देवरूख मधील विद्यार्थ्यांना शाळेतील एका शिक्षकाकडून बेदम मारहाण होत असल्याची तक्रार पालक व ग्रामस्थांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे केली आहे. या शिक्षकाचे अनेक प्रताप असून त्याचा पाढाही त्याने निवेदन देवून वाचला आहे. या शिक्षकावर त्वरित कारवाई झाली नाही तर एकाही विद्यार्थ्याला शाळेत न पाठवण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे.
शाळेतील या शिक्षकाबद्दल अनेक तक्रारी असून याबाबत आता पालक व ग्रामस्थ आक्रमक बनले आहेत. पालकांनी मंगळवारी जिल्हा परिषद प्रशासनाकडे धाव घेत लेखी निवेदन दिले आहे. हा शिक्षक मनमानी कारभार करत आहे. वेळेवर शाळेत न येणे, विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करणे, शाळा व्यवस्थापन समितीच्या सूचना न पाळणे, सहकारी शिक्षकांना कमी लेखणे, पालक सभेत ग्रामस्थांना अपमानित करणे व अपशब्द वापरणे, शाळेच्या वेळेत राजकीय व्यक्तींच्या गाठीभेटी घेणे, कोणालाही विश्वासात न घेता राजकीय व्यक्तींना बोलावून त्यांच्या मुलाखती घेणे, शालेय अभ्यासक्रम बाजूला ठेवून दिवसभर मुलांना संगणकावर व्यस्त ठेवणे, व्हिडिओ एडिट करणे, फोटोग्राफी करणे, रेकॉर्डिग करणे या अनावश्यक बाबी केल्या जात आहेत, असे या निवेदनात म्हटले आहे.
गतवर्षी शाळेतील विद्यार्थ्यांना वर्षा सहल निमित्त मालवण सिंधुदुर्ग येथे घेऊन जाण्यासाठी पालकांना विनंती करण्यात आली होती. मात्र यावेळी शाळा व्यवस्थापन समितीने मुलांना कोणत्याही धोक्याच्या ठिकाणी नेऊ नये, स्कुबा ड्रायव्हिंग, पॅरासिलिंग सारखे धाडसी प्रयोग करण्यास विद्यार्थांना भाग पाडू नये अशी सक्त सूचना देवूनही त्याकडे दुर्लक्ष केले गेले. कोणालाही विश्वासात न घेता लोकवर्गणी गोळा करणे तसेच त्याचा कुठल्याही प्रकारचा खुलासा न करणे असे प्रकार चालू आहेत, असेही या निवेदनात स्पष्टपणे म्हटले आहे.
अशा मनमानी कामकाज करणार्या या शिक्षकावर त्वरित कारवाई करावी. या शिक्षकाला शाळेत हजर करून घेवू नये. हा शिक्षक तळवडे तर्फे देवरूख शाळेत हजर झाल्यास एकही विद्यार्थी शाळेत पाठवण्यात येणार नाही, असे या निवेदनात म्हटलं आहे. मंगळवारी हे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे देण्यात आले.