(नवी दिल्ली)
मतदार संघापासून दूर असणा-या मतदारांसाठी आता निवडणूक आयोगाने रिमोट वोटिंग सिस्टीम तयार केली आहे. निवडणूक आयोगाने गुरुवारी यासंबंधीची घोषणा केली आहे. त्यामुळे आपण कुठेही असलो तरी तेथून मतदानाचा अधिकार बजावता येणार आहे. त्याची चाचपणी निवडणूक आयोगाने सुरू केली आहे.
“रिमोट इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन” म्हणजेच आरव्हीएमच्या मदतीने घरापासून दूर असणा-या मतदारांना आता विधानसभा, लोकसभा निवडणुकीत मतदान करता येणार आहे. या सुविधेमुळे मतदानासाठी त्याला मतदार संघात जावे लागणार नाही. यासंदर्भात निवडणूक आयोग १६ जानेवारी २३ रोजी सर्व राजकीय पक्षांना या आरव्हीएमचे थेट प्रात्यक्षिक दाखविणार आहे.
इतर राज्यांत काम करणारे लोक, स्थलांतरित मजूर आरव्हीएम सेवेचा वापर करू शकणार आहेत. मात्र, याचा अर्थ घरी बसून मतदान करता येणार नाही, तर आयोगाच्या या सुविधेचा लाभ घेण्यासाठी मतदानाच्या दिवशी रिमोट व्होटिंग मतदानाच्या ठिकाणी पोहोचावे लागेल.
यासंदर्भात मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार बाहेर राहणा-या मतदारांचा मतदानात सहभाग वाढविण्यासाठी ही सुविधा अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. विशेष म्हणजे आयआयटी मद्रासच्या मदतीने बनवलेले मल्टी कॉन्स्टिट्यून्सी रिमोट ईव्हीएम एकाच रिमोट मतदान केंद्रातून ७२ मतदारसंघ हाताळू शकते. आता या व्यवस्थेसंदर्भात अंमलबजावणीपूर्वी कायदेशीर, प्रशासकीय आणि तांत्रिक आव्हानांवर राजकीय पक्षांकडून मत मागविले जाणार आहेत. त्यानंतर त्यासंबंधीचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
बरेच मतदार असे आहेत, जे कामानिमित्त आपले शहर सोडून बाहेर राहतात. अशा मतदारांची संख्या तब्बल ४५ कोटींवर असल्याचा अंदाज आहे. मात्र त्याचा अधिकृत डेटा उपलब्ध नाही. परंतु या मतदारांची संख्या मोठी असल्याने आता निवडणूक आयोगाने त्यांच्या मतदानाचा विचार केला गेला असून, आता या सुविधेमुळे त्यांनाही मतदानाचा हक्क मिळू शकतो.