(राजापूर/प्रतिनिधी)
दुसऱ्यांच्या कामाचं श्रेय घेणं आणि दुसऱ्याच्या बापाला आपला बाप बोलणे ही शिवसेना खासदार विनायक राऊत आणि शिवसेनेची परंपराच आहे. मोदींच्या लाटेत भाजपच्या जीवावर निवडून आलेल्या खा. राऊत यांनी किती विकास कामे केली आणि आता काय करत आहे हे जनता बघत आहे. त्यामुळे रत्नागिरी विमानतळाचा प्रश्न खा. राऊत यांच्या प्रयत्नाने मार्गी लागतोय हे सांगणाऱ्या व कंत्राटदाराच्या हातातील बाहुले असलेल्या शिवसेना जिल्हा प्रमुख विलास चाळके यांनी अगोदर आत्मपरिक्षण करावे आणि मग भाजपा प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे याच्यावर भाष्य करावे असा टोला भाजपा जिल्हा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष नंदू चव्हाण यांनी लगावला आहे.
सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडून त्याची सोडवणूक करणे आणि विकासासाठी प्रसंगी पदरमोड करून काम करणाऱ्या निलेश राणे यांच्याशी तुंम्ही कधीच बरोबरी करू शकणार नाही हे लक्षात ठेवा असा सल्लाही चव्हाण यांनी दिला आहे.
रत्नागिरी विमानतळाचा प्रश्न लवकरच केंद्रीय उद्योगमंत्री ना. नारायण राणे व केंद्रीय उड्डाण मंत्री ज्योतिदित्याराजे शिंदीया यांच्याकडे पाठपुरावा करून मार्गी लावणार असल्याचे निलेश राणे यांनी यापुर्वीच सांगितले आहे. गेली आठ वर्षे खासदार असूनही राऊत यांनी रत्नागिरीतील विमानतळ प्रश्नाबाबत काहीच केले नसल्याचे नमुद करत निष्क्रीय खा. राऊत याच्या कार्यपध्दतीचा राणे यांनी पंचनामा केला होता. यावर शिवसेना जिल्हा प्रमुख चाळके यांनी खा. राऊत यांनी विमानतळासाठी पाठपुरावा केल्याचा दावा करत श्रेय लाटण्याची धडपड सुरू केली आहे. त्याला नंदू चव्हाण यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.
माजी खासदार निलेश राणे हे वेळ पडली तर स्वत: पदरमोड करून लोककल्याणाची व विकासाची कामे करतात. उद्योगमंत्री ना. नारायण राणे यांचा यांच्या अशीवार्दाने त्यांचा समाजसेवेचा वारसा ते चालवत आहेत. नोकरी, शिक्षण, आरोग्य सुविधा यांसारखी अनेक कामे त्यांनी केलेली आहेत. त्यामुळे त्यांची बरोबरी तुंम्ही कधीच करू शकत नाही असा टोला चव्हाण यांनी लगावला आहे.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तुम्हाला माझे उघड आव्हान आहे खा. राऊत यांनी निलेश राणेंसमोर येऊन मतदार संघात काय केले आठ वर्षात ते सांगावे आणि खासदार म्हणून पाच वर्षात आणि त्यानंतर आजही निलेश राणे काय करत आहेत हे ते सांगतील, एकदा होऊन जाऊदे असेही त्यांनी नमुद केले आहे.
त्यामुळे कंत्राटदाराच्या हातातील बाहुले असलेल्या विलास चाळके यांनी आत्मपरीक्षण करावे, मग त्यांनी निलेश राणे यांच्यावर भाष्य करावे. कारण काही करायचे नाही, आणि मग दुसऱ्यांनी केलेल्या कामाचे फुकाचे श्रेय लाटायचे हा शिवसेनेचा आणि खासदाराचा कायमचाच उद्योग आहे. त्यामुळे खासदार आणि कंत्राटदारानी सांगितल्यावर पत्रकार परिषद घेऊन विमानतळाच्या कामाच्या श्रेयासाठी उर बडवणाऱ्या चाळकेंनी आपल्याच खासदाराना आठ वर्षात काय दिवे लावले ते विचारले ते बरे होईल असा उपरोधिक टोलाही लगावला आहे.