( चिपळूण /प्रतिनिधी )
तालुक्यातील मौजे कोंढेमाळ येथे दुर्मीळ पोपट प्रजातीच्या पक्ष्यांची तस्करी केली जात होती. याबाबत वन विभागाला माहिती मिळताच तातडीने कारवाई करत मंगळवारी (दि. १५) एकास ताब्यात घेतले आहे. तसेच त्याच्याकडून ‘तुईया’ या प्रजातीच्या पोपटाची साधारण ६ महिने वयाची १० पिल्ले व एक वर्ष वयाचे २ असे एकूण १२ पक्षी आढळून आले आहेत.
याप्रकरणी जितेंद्र धोंडू होळकर, (रा. कोंढेमाळ, चिपळूण) याला ताब्यात घेतले आहे. तो विशिष्ट प्रजातीचे पोपट पकडून विक्री करत असलेबाबतची गुप्त माहिती वन विभागाला मिळाली होती. त्यानुसार विभागीय वन अधिकारी दीपक खाडे, सहायक वनसंरक्षक वैभव बोराटे, वनपरिक्षेत्र अधिकारी राजेश्री कीर, वन परिमंडळ अधिकारी दौलत भोसले, उमेश आखाडे, सुरेश उपरे व वनरक्षक राजाराम शिंदे, अश्विनी जाधव यांनी जितेंद्र होळकर याच्या कोंढेमाळ येथील राहत्या घरी व गुरांच्या गोठ्यामध्ये धाड टाकली. दरम्यान आजुबाजूच्या परिसरामध्ये पाहाणी केली असता घराशेजारील प्रभाकर जिवा करंजकर यांच्या लाकडाच्या खोपटीत दोन पिंजऱ्यामध्ये पोपट प्रजातीमधील प्लम हेडेड पॅराकीटया प्रजातीची साधारण ६ महिने वयाची १० पिल्ले व एक वर्ष वयाचे २ पक्षी आढळून आले.
लाकडाच्या डोलीतून सुमारे ४-५ महिने व १ वर्षापूर्वी ताब्यात घेतले आहेत. तसेच यापूर्वी मी १० ते १२ जणांना पोपट विकले असल्याचे सांगितले. यानंतर जितेंद्र धोंडू होळकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक पुढील तपास सुरू आहे.