(रत्नागिरी)
शहरातील उद्यमनगर, चंपक मैदान येथे सुरू असलेल्या सुपर स्टार सर्कसला रत्नागिरीकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कडक उन्हाळा असला तरीही सर्कस पाहायला रत्नागिरी शहर परिसर आणि तालुक्यातून अनेक जण येत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सर्कसमध्ये प्राण्यांच्या खेळावर बंदी आली असल्याने फक्त कलाकारांच्या कसरती, झुल्यावरील खेळ, जोकरचे विनोद दाखवावे लागत आहेत. मुळचे सांगलीतील प्रकाश माने या मराठी माणसाने सुपर स्टार सर्कस टिकवून ठेवली आहे. त्यामुळे रत्नागिरीकरांनी सर्कस पाहण्यासाठी यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
रत्नागिरीत ५ मे पासून सर्कस सुरू झाली आहे. या सर्कसमध्ये ५० कलाकार आहेत. ते नेपाळ, आसाम, बंगाल आदी भागांतील आहेत. सध्या उन्हाळी सुट्टी असल्यामुळे बच्चे कंपनीला सुट्टी आहे. त्यामुळे अनेक शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी सर्कस पाहण्यासाठी येत आहेत. सर्कस म्हटले की अनेकांना वाघ, सिंह, हत्ती, कुत्रे, विविध प्रकारचे पक्षी, त्यांच्या करामती, रिंगमास्टर, क्रिकेट खेळणारा हत्ती, सायकल चालवणारा हत्ती आणि पेटत्या गोलातून उडी मारणारे वाघ, सिंह आठवतात. परंतु या सर्व खेळांवर सर्वोच्च न्यायालयाने बऱ्या वर्षांपासून बंदी आणली. त्यामुळे कलाकारांच्या खेळांवरच सर्कस सुरू आहे. भारतामध्ये काही मोजक्या सर्कस असून त्यात मराठी माणसे कमी चालक आहेत. परंतु सांगलीतील प्रकाश माने यांनी जिद्दीने सुपर स्टार सर्कस टिकवून ठेवली आहे. त्यामुळे मराठी माणसासाठी ही कौतुकास्पद गोष्ट आहे, असे अनेक प्रेक्षकांनी सांगितले.
सुपर स्टार सर्कसमध्ये स्टंट, सायकलच्या कसरती, स्कायवॉक, जोकरच्या गमतीजमती, करमणूक म्हणून पाहायला मिळत आहे. सायंकाळी ४.००, ६.१५ आणि ८.३० असे ३ प्रयोग दररोज सुरू आहेत. एका वेळेस ८०० ते १००० प्रेक्षक बसू शकतील एवढी बैठक व्यवस्था ठेवण्यात आली आहे. जास्तीत जास्त रत्नागिरीकरांनी सर्कस पाहायला यावे, असे आवाहन सुपर स्टार सर्कसने केले आहे.
तीन पिढ्यांची परंपरा
सुपर स्टार सर्कसला तीन पिढ्यांची परंपरा आहे. माने कुटुंबीयांची तिसरी पिढी सर्कसच्या व्यवसायात आहे. या सर्कसचे मालक प्रकाश माने यांचे आजोबा दुष्काळ पडल्यामुळे १९३७ मध्ये सांगलीतीली जत गाव सोडून सर्कसमध्ये गेले. त्यानंतर वडिलसुद्धा सर्कशीत काम करू लागले. आजोबांनी सर्कस सुरू केली. जय हिंद सर्कस, पृथ्वी, न्यू रॉयल, नटराज, सम्राट अशी या सर्कसची नावे बदलत गेली. १९९३ मध्ये प्रकाश माने यांनी न्यू गोल्डन सर्कस सुरू केली. २००० सालामध्ये प्राण्यांवर बंदी आली. २०१३ मध्ये हत्तीवर बंदी आली आणि २०१९ नंतर कोरोनाचे संकट. त्यानंतर माने यांनी सुपर स्टार सर्कस सुरू केली. प्राण्यांवर बंदीमुळे सर्कसचा व्यवसाय ठप्प झाला. अनेकांनी सर्कस बंद केल्या. परंतु माने यांनी नव्याने सुरवात करून सुपर स्टार सर्कसचे प्रयोग सुरू केले आहेत.