(नवी दिल्ली)
दुर्धर आजार असलेल्या रुग्णांसाठी दिलासादायक बातमी आहे. सर्व दुर्धर आजारांवरील उपचारासाठी लागणाऱ्या जीवनरक्षक औषधांच्या आणि विशेष अन्नाच्या आयातीवरील सीमाशुल्क पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. अर्थमंत्रालयाने याबाबतची घोषणा केली असून त्याबाबतचीअधिसूचनाही जारी केली आहे.
या अधिसूचनेद्वारे सरकारने ‘राष्ट्रीय धोरण २०२१’ अंतर्गत असलेल्या सूचीबद्ध सर्व दुर्धर आजारांबाबत विशेष वैद्यकीय उपचार प्रक्रिया, औषधे, विशेष अन्नाच्या आयातीवर आकारण्यात येणाऱ्या सीमाशुल्कामध्ये पूर्णपणे सूट दिली आहे.
या सवलतीचा लाभ घेण्यासाठी, वैयक्तिक आयातदाराला केंद्रीय किंवा राज्याचे आरोग्य सेवा संचालक किंवा जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांचे (सिव्हिल सर्जन) प्रमाणपत्र जोडावे लागेल. पाठीच्या कण्याशीसंबंधित स्नायू विकार, स्पायनल मस्कुलर ऍट्रोफी किंवा स्नायू विकार, ड्यूशेन मस्कुलर डिस्ट्रॉफीच्या उपचारांसाठी निर्देशित औषधांना आधीच सूट देण्यात आली आली आहे.
अन्य दुर्धर आजारांवरील उपचारासाठी लागणाऱ्या औषधांच्या आयातीवरील सीमाशुल्कात सवलत मिळावी यासाठी मागणी सुरू होती. त्यामुळे या सवलतीनंतर रुग्णांच्या उपचार खर्चात बचत होणार असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. विविध कर्करोगांवरील उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या पेम्ब्रोलिझुमॅबला या मूलभूत सीमा शुल्कातून सरकारने पूर्णपणे सूट दिली असल्याचेही अर्थमंत्रालयाने म्हटले आहे.