(गुहागर)
खाडीच्या पाण्यात पडून खलाशाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पडवे वरचा मोहल्ला (ता. गुहागर) येथे रविवारी (३१ डिसेंबर) दुपारी घडली. संतोष सखाराम रसाळ (३५, रा. मासू, गणेशवाडी, गुहागर) असे त्याचे नाव आहे.
संतोष रसाळ हा शरफुल्ला हुसेन मिया माखजनकर यांच्या बोटीवर काम करत होता. रविवारी दुपारी त्याच्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्याने त्याला जेवायला बोलावले. मात्र, संतोष याने ‘मला भूक नाही तुम्ही जेवून घ्या’ असे सांगितले. त्यामुळे त्याचा सहकारी जेवायला गेला. त्यानंतर दुपारी १:४३ वाजण्याच्या दरम्यान पाण्यात काहीतरी पडल्याचा आवाज आला. ते पाहण्यासाठी त्याचा सहकारी गेला. त्यावेळी संतोष हा पाण्यात पोहत असल्याचे सहकाऱ्याला कळले. मात्र, थोड्या वेळाने तो पाण्यात बुडत असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर सहकाऱ्यांनी किनाऱ्यावरील लोकांना आवाज देऊन वाचविण्यासाठी हाक मारली.
लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन संतोष याला पाण्यातून बाहेर काढले. त्याला आबलोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्याला तपासून त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या प्रकरणी गुहागर पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून, अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे