(रत्नागिरी / प्रतिनिधी)
दादर येथे १२ फेब्रुवारी रोजी पुरस्काराचे वितरण
रत्नागिरी, दि.०३ प्रतिनिधी : भागोजी चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईचा पत्रकारिता विशेष पुरस्कार दैनिक सामनाचे पत्रकार दुर्गेश आखाडे यांना जाहीर झाला आहे. दि.१२ फेब्रुवारी रोजी दादर येथील देवाडिगा सभागृहात सायंकाळी साडेचार वाजता मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे.
भागोजी चॅरिटेबल ट्रस्ट दरवर्षी पत्रकारिता, सामाजिक, कला, शैक्षणिक आणि अन्य क्षेत्रामध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या पाचजणांना पुरस्कार देऊन गौरविते. यंदाचा पत्रकारिता विशेष पुरस्कार दैनिक सामनाचे पत्रकार दुर्गेश आखाडे यांना जाहीर करण्यात आला आहे. दुर्गेश आखाडे गेली २३ वर्षे पत्रकारितेत कार्यरत आहेत. त्यांनी लिहीलेल्या अधिक अधिक वजा या बालनाट्य पुस्तकाच्या तीन आवृत्या प्रकाशित झाल्या आहेत. या पुस्तकाला ज्येष्ठ अभिनेत्री डॉ.निशीगंधा वाड यांची प्रस्तावना लाभली आहे. ज्येष्ठ नाटककार कै.प्र.ल.मयेकर यांच्या नाट्यविषयी कारकिर्दीवर प्र.ल. या माहितीपटाचे लेखन त्यांनी केले असून हा माहितीपट दुरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर तीनवेळा प्रसारीत करण्यात आला.
पत्रकारितेबरोबर एकांकिकांचे लेखनही त्यांनी केले आहे. आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावर हंगामी उदघोषक म्हणून त्यांनी काम केले आहे. कोकण मराठी साहित्य परिषद रत्नागिरी शाखेचे युवक अध्यक्षपद ते सांभाळत आहेत. त्याचबरोबर द पॉवर ऑफ मिडीया फाउंडेशन या राज्यस्तरीय पत्रकार संघटनेचे दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याचे ते अध्यक्ष आहेत.