(चिपळूण / ओंकार रेळेकर)
नवोदय विद्यालयात इयत्ता सातवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या तालुक्यातील आबलोली येथील अनुज साळवी याने जागतिक मान्यताप्राप्त वर्ल्ड क्यूब असोसिएशन मार्फत संयुक्त अरब अमिराती दुबई येथे १६ ते १७ डिसेंबर या कालावधीत घेण्यात आलेल्या सनमार्क दुबई ओपन २०२२ या स्पर्धेत दोन पदकांची कमाई केली. आहे.
या स्पर्धेत जगभरातील २८ देशांमधून १५० स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. यामध्ये भारत, जॉर्डन, संयुक्त अरब अमिराती, पाकिस्तान, इजिप्त, कॅनडा, सीरिया, युनायटेड किंगडम, तुर्की, रशिया, बहरीन, फिलिपाईन्स, ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, सौदी अरेबिया, लेबनन, कोरिया, जपान, ओमन, इटली, फिनलँड, डेन्मार्क, इक्वेडोर आदी देशांचा सहभाग होता.
यामध्ये गुहागर तालुक्यातील आबलोली येथील अनुज साळवी याने एक रौप्य व एक कांस्य पदक मिळवल्याने या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.अनुज हा आबलोली येथील सुयश कॉम्प्युटरचे संचालक संदेश साळवी यांचा सुपुत्र आहे.