(वेळणेश्वर / उमेश शिंदे)
शुक्रवारी सकाळी 6.30 च्या सुमारास खालची शीर येथील आबलोली रस्त्यालगतच्या शेतात अपघातग्रस्त दुचाकी व बेशुध्द पडलेले दोन तरुण ग्रामस्थांना दिसले. ग्रामस्थांनी तातडीने ही बाब पोलीस पाटील घाणेकर यांच्या कानावरती घातली. घाणेकरांनी तात्काळ गुहागर पोलीस स्टेशनला याची माहिती दिली व जखमी ना एका खाजगी गाडीमधून आबलोली आरोग्य केंद्रामध्ये दाखल केले. अपघाताची माहिती मिळताच गुहागर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आरोग्य केंद्रामध्ये दाखल केल्यानंतर दोघांपैकी एका तरुणाचा मृत्यू झाल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी घोषीत केले. बेशुध्द असलेल्या दुसऱ्या तरुण उपचारादरम्यान शुध्दीवर आल्यावर मृताची ओळख पटविण्यात आली.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, चिपळूण तालुक्यातील कादवड गावातील शैलेश सुनील जाधव (वय 20) आणि रोहीत दिपक निकम (वय 19) हे दोन तरुण शुक्रवारी पहाटे 4 वाजता दुचाकीने (एमएच 08 यू 2356 ) तवसाळकडे निघाले होते. तवसाळला आंबा काढणीचे कामासाठी चालले होते. सकाळी 6 च्या सुमारास ते शीर येथे आले. खालची शीर येते आबलोली रस्त्यावर एक तीव्र वळण आहे. या वळणात भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटले आणि दोघेही रस्त्याच्या बाजुला असलेल्या शेतात शिरले.
तेथे काजुच्या झाडाची एक फांदी आडवी आली होती. दोघेही या फांदीवर आपटून बेशुध्द पडले. जवळपास अर्धातास हे तरुण बेशुध्दावस्थेत होते. 6.30 च्या सुमारास ग्रामस्थांनी हा अपघात पाहून पोलीसपाटील घाणेकर यांना माहिती दिली. त्यांनी गुहागर पोलीस स्टेशन येथे तात्काळ माहिती दिली तातडीने गुहागरचे पोलीस घटनास्थळी पोहचले. पोलीसांनी शैलेश आणि रोहीतला बेशुद्धावस्थेतच आबलोली आरोग्य केंद्रात नेले. आरोग्य केंद्रातील वैद्यकिय अधिकारी यांनी शैलेश सुनील जाधव या मयत असल्याचे घोषीत केले. तसेच रोहीत निकमवर उपचार सुरु केले.
उपचारादरम्यान रोहीत शुध्दीवर आल्यानंतर त्याने ही सर्व हकिकत पोलीसांना सांगितली. त्यामुळे मृत शैलेशच्या नातेवाईकांना कळविणे शक्य झाले. दोघांच्याही डोक्याला फांदीवर आपटून गंभीर दुखापत झाली आहे. शुक्रवारी दुपारनंतर रोहीत निकम याला अधिक उपचारांकरीता रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर शव विच्छेदनानंतर शैलेशचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
पोलीस पाटील घाणेकर यांच्या तक्रारीवरून भरधाव वेगाने गाडी चालवून अपघात केल्याप्रकरणी मोटार सायकल चालक शैलेश जाधव याच्यावरती भादवि कलम 304(अ) 279,337,338 मोटार वाहन कलम 184 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पवन कांबळे करत आहेत.