(चिपळूण)
दुचाकी गाडीच्या स्पिडोमिटर व हेडलाईटचे काम करुन दिले नाही याचा राग मनात धरुन चार अनोळखी व्यक्तीनी कामगारांना मारहाण केल्याची घटना बुधवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली. यात एकाच्या डोक्याला दुखापत झाली आहे. मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुधवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मार्कंडी येथील मेहता पेट्रोलपंप-शेजारील ऑटो इलेक्ट्रीशन नावाच्या गॅरेजमध्ये एका दुचाकीवरून अनोळखी व्यक्ती व त्याचे अनोळखी तीन मित्र असे चौघेजण आले व त्यांनी त्याच्या दुचाकीचे स्पिडोमिटर व हेडलाईटचे काम करून देण्यास सांगितले. पण गॅरेजमधील कामगारांनी त्यांना नकार दिला. यामुळे त्या चार अनोळखी व्यक्तीनी या कामगारांना मारहाण करत शिविगाळ केली. तसेच जमीर मुल्लाणी यास जोरात ढकल्याने तो गॅरेजमधील एका दुचाकीवर आदळल्याने त्याच्या डोक्याला दुखापत झाली आहे. तसेच त्या चौघानी मिळून अकिल संदे, मेहबूब संदे यांना मारहाण केल्याने त्यांनाही दुखापत झाली आहे. याप्रकरणी त्या चौघांविरुध्द येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.