(नागपूर)
दिशा सालियान आत्महत्या प्रकरणी राज्य सरकारकडून मुंबई पोलिसांना एसआयटी स्थापन करण्याचे लेखी आदेश देण्यात आले होते. त्यानंतर तत्काळ कार्यवाही झाली असून मुंबई पोलीस आयुक्तांनी एसआयटी स्थापन केली असून तपास अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. मुंबई पोलिस आयुक्तांनी दिशा सालियान आत्महत्या प्रकरणी फेरतपासाचे आदेश दिले आहेत. अप्पर पोलिस आयुक्त उत्तर विभाग राजीव जैन हे एसआयटीचे नेतृत्त्व करणार आहेत.
गेल्या हिवाळी अधिवेशनात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिशा सालियान मृत्यू प्रकरणी रकळ चौकशीचे आदेश दिले होते. अखेर आज मुंबई पोलिसांना एसआयटीसंदर्भात लेखी आदेश देण्यात आले आहेत. मुंबई पोलिस आयुक्तांनी दिशा सालियान मृत्यु प्रकरणी फेरतपासाचे आदेश दिले आहेत. परिमंडळ ११ चे पोलीस उपायुक्त अजय बन्सल आणि मालवणी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक चिमाजी आढाव यांच्या नेतृत्वात प्रकरणाचा तपास करण्यात येणार आहे. त्याशिवाय, अप्पर पोलीस आयुक्त उत्तर विभाग राजीव जैन हे टीमचं नेतृत्व करणार आहेत. यामध्ये क्राईम ब्रांच आणि इतर युनिट्सच्या तज्ञ अधिका-यांचा समावेश करण्यात येणार आहे.
दिशा सालियान हीने आत्महत्या केली असल्याचे मुंबई पोलिसांनी आपल्या आधीच्या क्लोजर रिपोर्टमध्ये म्हटले होते. त्यानंतर दिशा सालियान आत्महत्या प्रकरणात राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले होते. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर भाजप आमदार नितेश राणे यांच्याकडून सातत्याने आरोप सुरू होते. आता विशेष चौकशी स्थापन करण्यात आल्यानंतर पुन्हाने तपास होणार आहे.
खुशाल एसआयटी चौकशी करा – संजय राऊत
दिशा सालियन मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरे यांची एसआयटी चौकशी होणार आहे. या प्रकरणी एसआयटी स्थापन करायची असेल, हा तपास सीआयएकडे द्यायचा असेल किंवा केजीबीकडे द्यायचा असेल तर द्या, असे आव्हान उबाठा शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना राज्य सरकारला दिले. आपल्या राजकीय विरोधकांच्या संदर्भात खोटे भ्रम निर्माण करायचे, बदनामी करायची आणि आपली राजकीय पोळी भाजायची हा सरकारचा डाव आहे. हा बदनामी करण्याचा कारखाना आहे. पण आम्ही त्यांना भीक घालत नाही. त्यांना एसआयटी लावायची असल्यास खुशाल लावावी. लाखो लोक शिवसेनेत आहेत. प्रत्येकामागे एसआयटी लावा. राज्यात कायदा सुव्यवस्थेबद्दल काही बोललेले सरकारला आवडत नाही. 2024 नंतर सरकार बदलणार आहे. कोणी सत्तेचा अमरपट्टा बांधून आलेला नाही, असे राऊत यांनी सांगितले.
मुंबई महापालिकेचे ऑडिट होणार आहे. नक्कीच करा. फक्त मुंबई महानगरपालिका नाही तर पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, ठाणे या सर्व महानगरपालिकांचे ऑडिट व्हायला पाहिजे. आणि नगर विकास खात्याचा गेल्या दीड वर्षाच्या कारभाराचे आणि व्यवहाराचे ऑडिट करा. कारण महापालिका नगर विकास खात्याच्या अंतर्गत येतात. मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला. त्यांच्यावर दबाव येत होता. आधी सदस्यांनी राजीनामे दिले आता अध्यक्षांनीही दिला. विशिष्ट अहवाल देण्यासाठी त्यांच्यावर दबाव येत होता, असेही ते यावेळी म्हणाले.