(दापोली)
आपल्या महाराष्ट्रातील गड किल्ले यांना फार प्राचीन काळापासून अनन्यसाधारण महत्त्व आहे. दिवाळीतील किल्ले बनवण्याची परंपरा ही आपल्या पूर्वजांनी आपला गौरवशाली इतिहास लहान मुलांनी अभ्यासावा याकरता निर्माण केलेली एक संधी आहे. दापोलीमध्येही चिमुकल्यांसह तरुणांनी विविध किल्ले साकारले आहेत. हे किल्ले पाहण्यासाठी रविवार ३० ऑक्टोबर २०२२ रोजी दापोली सायकलिंग क्लबतर्फे सायकल फेरी काढण्यात आली.
आझाद मैदानातून सुरु झालेली सायकल फेरी केळस्कर नाका – गाडीतळ – प्रभूआळी – झरीआळी – फॅमिली माळ – नर्सरी रोड – पांगारवाडी – आनंदनगर – लष्करवाडी – उदयनगर – लालबाग – आझाद मैदान अशा १० किमीच्या मार्गावर झाली. यामध्ये सर्व वयोगटातील नागरिक सायकल चालवत सहभागी झाले होते. या सायकल फेरी मार्गावरील किल्ल्यांना भेट देऊन ते बनवणाऱ्यांचे कौतुक करण्यात आले. दिवाळीमध्ये दगड मातीपासून किल्ले बनवण्याची मजा काही वेगळीच असते. सुराज्य मित्र मंडळ यांनी साकारलेला भव्य प्रतापगड, प्रभुआळी येथील कदम, ध्रुव किरडावकर व मित्रांनी बनवलेला लोहगड, लालबाग येथील राळे, पाटील यांचा भव्य राजगड, आग्रे, गोवले यांचे किल्ले, पांगारवाडी मधील शिगवण, कदम, आनंदनगरमधील गावडे, लष्करवाडीमधील जाधव, सम्यक पाते यांच्या येथील जंजिरा किल्ला पाहण्यासारखे आहेत. तसेच या मार्गावर इतर अनेक किल्ले मस्तच सजवलेले आहेत. सर्वांनी हे किल्ले बनवण्यासाठी वापरलेले साहित्य, सजावट इत्यादींबद्दल जाणून घेतले.
सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी, या हेतूने सर्वांसाठी दापोली सायकलिंग क्लबमार्फत अनेक उपक्रम राबवले जातात. या सायकल फेरीचे नियोजन करण्यात अंबरीश गुरव, रोहन कदम, सुरज शेठ, विनय गोलांबडे, सचिन खटावकर, केतन पालवणकर, संदेश चव्हाण इत्यादींनी मोलाची भूमिका बजावली. ६ नोव्हेंबर २०२२ रोजी दापोली विंटर सायक्लोथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याची नोंदणी लवकर करावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.