(मुंबई)
मुंबई ते दिल्ली हा देशांतर्गत सर्वात महागडा विमानप्रवास ठरला आहे. दिल्ली ते मुंबई २४ तासांच्या एडव्हान्स विमान तिकिटाची किंमत सध्या सुमारे १४ हजार रुपयांपर्यंत गेली आहे. जी जागतिक स्तरावर सर्वात महागड्या देशांतर्गत विमान भाड्यांपैकी एकआहे. विशेष म्हणजे दिल्ली-मुंबई हा भारतातील सर्वात व्यस्त देशांतर्गत मार्ग आहे. त्यामुळे या विमान भाडेवाढीमुळे प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. इंधनाच्या किमती आणि महागाई याचा विमान भाडेवाढीवर परिणाम झाल्याचं सांगण्यात येत आहे.
एअरपोर्ट्स कौन्सिल इंटरनॅशनल आशिया-पॅसिफिकने केलेल्या अभ्यासात म्हटले आहे की, हिंदुस्थानात विमान भाड्यात सर्वाधिक ४१ टक्के वाढ नोंदवली गेली आहे, त्यानंतर UAE३४ टक्के याचा नंबर लागतो. महागलेल्या विमान भाड्यांमुळे उद्योग जगताला फटका बसणार आहे. तर वाढलेल्या दरामुळे विमान प्रवाश्यांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे. तसेच आधीच तणावाखाली असलेल्या विमान क्षेत्रावरील आर्थिक भार वाढून संबंधित उद्योगावर दूरगामी प्रभाव पडू शकतो, असे या अहवालात म्हटलं आहे.