(मुंबई)
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांना सोबत घेऊन बंड करत रविवारी राजभवनात सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या आणखी ८ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांना ३७ आमदारांचा पाठिंबा असल्याचे समजते. पण राज्याच्या राजकारणात घडलेला आजचा हा महाभूकंप कसा घडला, याची चर्चा चांगलीच रंगली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांना सरकारमध्ये सामिल करून घेण्याबाबत दिल्लीतून सूत्रे हलली आणि राज्यात महाभूकंप घडला. मागील काही दिवसांपासून अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे आणि छगन भुजबळ यांच्यात याबाबत चर्चा झाल्या आणि नाट्यमय घडामोडी सुरू झाल्या होत्या. यानंतर हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील आणि काही इतर नेतेही या घडामोडींना वेग देण्यासाठी पुढे आले. येथे अजित पवार यांची तयारी सुरू असताना ४ जून रोजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दिल्लीत जाऊन अमित शाह, जेपी नड्डा यांची भेट घेतली. या भेटीत अजित पवार यांच्या गटाला कसे सोबत घ्यायचे, यावर रणनिती ठरवण्यात गेली असल्याचे सांगितले जाते.
यानंतर अजित पवार यांच्यासोबत आलेल्या वरिष्ठ नेत्यांनी स्वत: सोबत दोन-तीन आमदार आणण्यास सांगितले. यावर काम सुरू केले गेले आणि जेव्हा ही संख्या ३० च्या पार गेली, तेव्हा अजितदादांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा सुरू केली, असे बोलले जात आहे. एवढेच नव्हे, तर अजितदादा यांनी जून महिन्यात दिल्लीत जाऊन अमित शाह यांची गुपचुप भेट घेतली आणि त्यानंतर शाह यांनी राज्याच्या नेत्यांना पुढे चर्चा करण्यासाठी सांगितले. त्यानुसार २२ जून रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवास्थानावर अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी भेट घेतली. त्या रात्री जवळपास दोन तास या नेत्यांमध्ये चर्चा झाली आणि राज्य पातळीवर घडामोडींना वेग आला, असे सांगितले जात आहे.
अजित पवारांसोबत सगळे ठरल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी रातोरात दिल्ली दौरा करून अमित शाह, जेपी नड्डा यांचेशी राज्याच्या राजकीय घडामोडींबद्दल चर्चा केली. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार, शपथविधी समारंभावर शिक्कामोर्तब केले गेले. दिल्लीतून परतल्यानंतर सीएम, डीसीएम आणि अजित पवार यांच्यात अज्ञातस्थळी बैठक झाली, ज्यात अंतिम चर्चा पूर्ण केली गेली, असे सांगितले जात आहे.
शिंदे गटाच्या त्या ५ मंत्र्यांची वाढली चिंता
राज्यात राष्ट्रवादीचे नेते सरकारमध्ये सामिल झाल्याने आधीच्या काही मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यात शिंदे गटाच्या ५ मंत्र्यांना ‘नारळ’ देण्याचे आदेश भाजपच्या हायकमांडकडून देण्यात आल्याची चर्चा होती. त्यामुळे आता अजित पवारांच्या या निर्णयाने त्या ५ मंत्र्यांची चिंता वाढली आहे. मंत्रिमंडळात असलेल्या शिंदे गटाच्या ५ मंत्र्यांच्या कामकाजावर भाजपचे दिल्लीतील नेते नाखूष असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे शिंदे गटाचे संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, गुलाबराव पाटील आणि संजय राठोड यांना मंत्रिपदावरून हटवून त्यांच्याजागी इतर आमदारांची निवड करण्याचे आदेश भाजपच्या हायकमांडकडून देण्यात आल्याची चर्चा होती. त्यात आता अजित पवार सत्तेत सामील झाल्यावर आणि त्यांच्यासह ९ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्याने शिंदे गटाच्या ५ मंत्र्यांची पदे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांची चिंता वाढली आहे.