(धर्मशाला)
आयपीएल 2023 च्या ६४व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्जचा १५ धावांनी पराभव केला. १७ मे (बुधवार) रोजी धर्मशाला येथे झालेल्या सामन्यात दिल्लीने पंजाबला विजयासाठी २१४ धावांचे लक्ष्य दिले होते. दिल्लीने दिलेल्या २१४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबचा संघ ८ विकेटच्या मोबदल्यात १९८ धावांपर्यंत मजल मारु शकला. पंजाब किंग्जसाठी लियाम लिव्हिंगस्टोनने ४८ चेंडूत ९४ धावांची संस्मरणीय खेळी खेळली. यादरम्यान लिव्हिंगस्टोनने ९ षटकार आणि ५ चौकार लगावले. त्याशिवाय अथर्व तायडे यानेही संयमी अर्धशतक झळकावले. दिल्लीने पंजाबचा पराभव करत यंदाच्या हंगामातील पाचव्या विजयाची नोंद केली. दिल्लीचा संघ १० गुणावर पोहचला.
दिल्लीविरोधातील पराभवामुळे पंजाबचे प्लेऑफचे आव्हान खडतर झाले. पंजाबचा एक सामना बाकी आहे. त्या सामन्यात जरी विजय मिळवला तरी ते १४ गुणांपर्यंत मजल मारतील. त्यामुळे इतर संघाच्या कामगिरीवर पंजाबचे प्लेऑफचे आव्हान अवलंबून असेल. २१४ धावांचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात निराशाजनक झाली. कर्णधार शिखर धवन शून्यावर बाद झाला. अमन खान याने धवनचा जबराट झेल घेतला. कर्णधार माघारी परतल्यानंतर युवा अथर्व तायडे आणि प्रभसिमरन यांनी पंजाबचा डाव सावरला. दोघांनी पंजाबच्या डावाला आकार दिला. प्रभसिमरन याने १९ चेंडूत २२ धावांची खेळी केली. त्यानंतर लिव्हिंगस्टोनने एकहाती लढत दिली. परंतु त्याला विजय खेचून आणता आला नाही.