(चिपळूण)
महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी गुरुवारपासून कोकण दौऱ्याला सुरुवात केली आहे. राज ठाकरेंनी पक्षबांधणी संदर्भात दापोली, चिपळूण आणि खेड येथील मनसे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. खेडमध्ये पार पडलेल्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी आपली आगामी भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी राज ठाकरे यांनी खेडमध्ये भाषण करताना एकला चलोचा नारा दिला आहे. आपल्याला कुणाशी युती नको, ना कुणाच्या भानगडी नको. ऐन मोक्याच्या वेळी मला तुमची साथ हवी आहे. मागच्या वेळेचे काय झाले ते झालं या वेळेचा नगर परिषदेच्या निवडणुका आपल्याला स्वबळावर लढवायच्या आहेत. कुणालाही बरोबर घ्यायचं नाही. कुणाशीही युती नको किंवा दुसरे काही भांडण नको. मला खात्री आहे. मनसे जेव्हा स्वबळावर निवडणूक लढवेल तेव्हा जनता आपल्याला यश नक्की देईल, असं म्हणत राज ठाकरे यांनी युतीच्या मुद्द्यावर भाष्य केलं.
महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे. माझी अपेक्षा आहे, मला तुमची साथ हवी आहे. माझ्या सारख्या माणसाच्या मनात कुठे राग आहे, तो निघाला पाहिजे. याबद्दल पुढच्या दहा-पंधरा दिवसांमध्ये माझ्या मनात असलेला राग काढेल. एक सही संतापाची प्रयोगाला लोकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. मला येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील जनता त्यांचा राग व्यक्त करते का, हे पाहायचं आहे की पुन्हा यांच्या पैशाचा तमाशावरती विकले जातात? कारण त्याच त्या गोष्टी वारंवार होत असेल आणि तुम्ही नुसतं मतदान करत असाल तर या निवडणुकीला काहीच अर्थ नाही. कशाला उमेदवार उभे करायचे. सध्या हे जे चाललंय ते पाहून महाराष्ट्रातील जनतेला आनंद वाटत असेल तर मग भोगा, असंही राज ठाकरे म्हणाले.
17 वर्षे झाली तरी आपल्या कोकणातला रस्ता का होत नाही? समृद्धी महामार्ग जर साडेचार वर्षात पूर्ण होत असेल तर आपल्या कोकणातला रस्ता 17 वर्षे झालं तरी पूर्ण का होत नाही. मागच्या वेळी आलो तेव्हा नितीन गडकरींना फोन केला, तेव्हा त्यांनी सांगितले की स्थानिक कॉन्ट्रॅक्टर पळून गेले आहेत. कोकणवासियांना काहीतरी वेगळे देण्यासाठी मी तुमच्या मनगटात ताकद देण्याचा प्रयत्न करतो आहे, असं राज ठाकरे म्हणाले. कोकणात अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे आहेत. आपण हे सगळं निपूटपणे भोगतो. एवढ्या सगळ्या गोष्टी भोगल्यानंतर, आपण पुन्हा त्यांनाच मतदान करण्यासाठी रांगेत उभं राहतो. अनेक आमदार-खासदार निवडून देता. अनेकदा तेच तेच लोक पुन्हा निवडून देता, याचं मला आश्चर्य वाटतं, असंही राज ठाकरे म्हणाले.
राज्यात ‘एक सही संतापाची’ हा कार्यक्रम आपण राज्यभर राबवला. त्याला जनतेतून प्रचंड असा प्रतिसाद मिळाला. लोकांनी येऊन येऊन त्याच्यावरती सह्या केल्या. मला आता एकच पहायचे आहे की, येणाऱ्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता त्यांचा राग व्यक्त करतेय का, की पुन्हा यांच्या पैशाच्या तमाशावर विकले जाणार आहात का, असा बोचरा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खेड येथील सभेत बोलताना व्यक्त केला.
राज ठाकरेंनी चिपळूणमध्ये पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीवर भाष्य केले. दारू आणि मटणासाठी निवडणुका लढवायच्या का? अशा शब्दात राज ठाकरे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांवर बरसले. येत्या १५ दिवसांत राज ठाकरे विविध ठिकाणी मेळावे घेऊन राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करणार असल्याची माहिती दिली. पदाधिकाऱ्यांना पक्ष सांगेल ते काम करावे लागणार. अन्यथा त्यांना पदावर राहता येणार नाही, असाही दम राज ठाकरेंनी दिला. कार्यकर्त्यांनी शाखा नव्हे तर नाका उभा करा, जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवा. महाराष्ट्रावरचे प्रेम कमी होऊ देऊ नका. तुमच्यातला राग कमी होऊ देऊ नका, राज्यासाठी लढले पाहिजे, राज्यातील लोकांवर प्रेम करा, पक्ष नव्हेतर कुटुंब म्हणून काम केले पाहिजे, असे राज ठाकरे म्हणाले. तसेच लोकसभेची निवडणूक का लढवायची? दारु, मटणासाठी निवडणुका लढवायच्या का? असा प्रश्नही राज ठाकरे यांनी उपस्थित केला.