(संगमेश्वर)
पिरंदवणे डीगणी येथे मासे विक्री करणाऱ्या सईदा रिझवान सय्यद हिचा जयेश रमेश गमरे याने खून केल्याचे पोलिसांनी उघड केलं. त्यानंतर आता पोलिस तपासात त्याने या महिलेचा कोणत्या कारणासाठी खून केला हे समोर आले आहे. दारूच्या आहारी गेलेल्या जयेश याने दारूसाठी पैसे नसल्याने सईदा यांचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. एवढेच नव्हे तर या तरुणावर अन्य काही गुन्हे आहेत.
संगमेश्वर तालुक्यातील पिरंदवणे तारवाशेत येथे मच्छीविक्रेती महिला सईदा रिझवान सय्यद ही मृतावस्थेत सापडली होती. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती. पोलिसांनी तपास करीत ७ दिवसांत पिरंदवणे बौद्धवाडी येथील जयेश रमेश गमरे याला अटक केली. जयेश गमरे याची घरची परिस्थिती गरिबीची असून त्याला दारूचे व्यसन आहे. दारूचे लागलेले व्यसन पूर्ण करण्यासाठी त्याला पैशाची कमतरता भासत होती. पैशांच्या हव्यासापोटी त्याने सईदा रिझवान सय्यद हिचा खून केल्याचे पोलीस तपासात पुढे येत आले. जयेश गमरे याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्याच्यावर देवदेवतांची विटंबनाप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. त्याची घरची परिस्थितीही बेताचीच असून तो शेळीपालन करीत आहे. त्याचे वागणेही विक्षिप्त असल्याचे पोलीस तपासात पुढे येत आहे. महिलांशी तो अश्लील वागत होता. त्यामुळे महिला वर्ग त्याच्यापासून घाबरून असत. परिसरात त्याच्याबद्दल फारसे कोणी चांगले बोलत नसत.
या खूनप्रकरणी पोलीस निरीक्षक उदय झावरे तसेच पोलीस सचिन कामेरकर, संतोष झापडेकर, कांबळे, किशोर जोयशी, आव्हाड आदी पोलीस तपास करीत आहेत.