( राजापूर / प्रतिनिधी )
तालुक्यातील आंबोळगड येथे दारूसाठी पैसे मागितले असता ते न दिल्याने मारहाण केल्याची घटना घडली. सुहास सिताराम पारकर (65 ) असे जखमी झालेल्या वृद्धाचे नाव आहे. सध्या ते गंभीर जखमी असून मृत्यूशी झुंज देत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यांना अधिक उपचारासाठी मुंबई येथील जे जे रुग्णालयात हलविण्यात आल्याचे समजते. या मारहाण प्रकरणी अमित करगुटकर, अविनाश करगुटकर, संतोष बाबाजी नार्वेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
या संदर्भात सागरी पोलीस ठाणे नाटे आणि ग्रामस्थ यांच्याशी संपर्क केला असता असे समजले की, सुहास पारकर हे मुंबई येथून आपल्या कामासाठी आंबोळगड या गावी आलेले असताना आपल्याला दारू पिण्यासाठी पैसे द्या अशी मागणी आरोपींकडून करण्यात येत होती. त्याने दारू पिण्यास पैसे देण्यास नकार दिल्याने या आरोपींनी सुहास पारकर यांना घरात घुसून बेशुद्ध पडेपर्यंत जबर मारहाण केली. त्यामध्ये त्यांना गंभीर दुखापती झाल्या.
सुहास पारकर हे कामासाठी गावी एकटेच आलेले असल्याने जखमी अवस्थेतील पारकर यांना गावातील उज्वला पारकर , विश्वास करगुटकर, हरी विजय वाडेकर, गुरु नार्वेकर, बनाजी पारकर, मच्छिंद्र नार्वेकर, प्रमोद लाड, संतोष मांजरेकर, वसंत पारकर, शाम करगुटकर आदींनी ॲम्बुलन्समधून पहिल्यांदा धारतळी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि तेथून पुढे रत्नागिरी येथे हलविले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी मुंबई येथे नेण्यात आले आहे.
जखमी पारकर व त्यांचे नातेवाईक ही मुंबईत असल्याने नाटे पोलिसांकडे उल्हास श्रीधर करगुटकर यांनी लेखी तक्रार दाखल केली. पोलीसानी अमित चंद्रकांत करगुटकर, अविनाश चंद्रकांत करगुटकर, संतोष बाबाजी नार्वेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
संशयित आरोपींवर यापूर्वीही अनेक तक्रारी झाल्या असल्याचे तसेच आपल्या आई-वडिलांनाही मारहाण करीत असल्याचे गावातील अनेकांनी म्हटले असून यांच्यामुळे गावात दहशतीचे वातावरण असून पोलिसांनी यांचा योग्य तो बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे .