(खेड)
खेड तालुक्यातील माणी देऊळवाडी येथे विदेशी दारु विकणाऱ्यावर धाड टाकून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. दिलीप धोंडू कदम असे या संशयित आरोपीचे नाव असून त्याच्याकडून ११ हजार रुपये किमतीचे विदेशी मद्य जप्त करण्यात आले आहे.
माणी देऊळवाडी येथे विदेशी दारू विकली जात असल्याची माहिती खेड पोलीस स्थानकाचे सहायक पोलीस निरीक्षक सुजित गडदे यांना मिळाली होती. या माहितीनुसार सुजित गडदे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी दिलीप कदम याच्या घरी धाड टाकली असता त्यांना ११ हजार रुपये किमतीचे विदेशी दारू मिळून आली
खेड पोलिसांनी ही दारू जप्त करून दारूची विक्री करणारा दिलीप कदम याला ताब्यात घेतले. गेल्या काही महिन्यात सहायक पोलीस निरीक्षक सुजित गडदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी खेड तालुक्यात अनेक अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यावर कारवाई केली आहे. यामध्ये गावठी दारू, विदेशी दारू विक्रेत्यांचा समावेश आहे. पोलिसांनी तालुक्यात अवैध गांजा विकणाऱ्यांवरही कारवाई केली असून अनेकांना गजाआड केले आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे दारू आणि गांजा व्यवसाय करणाऱ्याचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.