(दापोली)
बसस्थानकात एसटी बसमध्ये शिरत असलेल्या प्रवाशाच्या खिशातून ५ हजार रुपये चोरणाऱ्या संशयितास पकडण्यात दापोली पोलिसांना यश आले आहे.
दापोली पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, बुरोंडी भांडारवाडा येथील दिगंबर मधुकर बुरोंडकर व त्यांची पत्नी कल्पना शुक्रवारी (ता. २५) दुपारी १.३० वा. दापोली बसस्थानकातून सुटणाऱ्या दापोली- बुरोंडी शीतलनगर या बसमध्ये चढत असताना त्यांच्या पँटच्या डाव्या खिशात कोणीतरी हात घालत असल्याचे त्यांना समजल्यावर त्यांनी खिशाला हात लावला असता त्यांच्यामागे असलेल्या इसमाने त्यांच्या खिशातील ५ हजार रुपये काढून घेऊन पळ काढला.
बुरोंडकर यांनी चोर चोर असे ओरडण्यास सुरवात केल्यावर बसस्थानकात असलेल्या पोलिसांनी या चोराचा पाठलाग करून त्याला पकडले. अंकुश धोंडू झोरे असे या संशयित चोरट्याचे नाव आहे. दीपक बुरोंडकर यांनी दापोली पोलिस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली असून, या तक्रारीनुसार संशयित अंकुश झोरे याच्या विरोधात दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे