( रत्नागिरी )
गेल्या वर्षी शॉर्टसर्किटमुळे आकस्मिक आग लागून दापोली पोलिस ठाण्याचे नुकसान झाले होते. त्याची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तातडीने दुरुस्ती करण्यात आली. ३३ लाख १४ हजार निधी उपलब्ध करून देऊन दापोली पोलिस ठाण्याचे नूतनीकरण पूर्ण झाले आहे. उद्या (ता. २८) दुपारी ३ वाजता उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.
या वेळी रत्नागिरी-रायगड लोकसभा मतदार संघाचे खासदार सुनील तटकरे, आमदार योगेश कदम, कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रवीण पवार उपस्थित राहणार आहेत. दापोली पोलिस ठाण्याला १४ जून २०२२ आग लागली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून विशेष दुरुस्ती कार्यक्रम २०२२-२३ अंतर्गत ३३ लाख १४ हजार निधी उपलब्ध करून देण्यात आला. त्यातून नुतणीकर जलद गतीने पूर्ण करून उद्या त्याचे लोकार्पण होत आहे.
या वेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड तसेच पोलिस अधिकारी/ अंमलदार यांच्या उपस्थितीत उद्या दुपारी तीन वाजता हा सोहळा होणार आहे. दापोलीकरांनी लोकार्पण सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे.