(दापोली)
शहरात वाढत असलेली वाहनांची संख्या व त्यामुळे पर्यावरणात वाढणारे प्रदूषण थांबण्यासाठी दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स महाविद्यालयात रविवार १७ डिसेंबर २०२३ रोजी ‘नो व्हेईकल डे’ साजरा करण्यात आला. त्यानिमित्त नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने महाविद्यालयाच्या क्रीडा विभागामार्फत, दापोली सायकलिंग क्लबच्या सहकार्याने स्लो सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीही यामध्ये सहभागी होत सायकल चालवण्याचा आनंद लुटला.
‘नो व्हेईकल डे’ निमित्त बाईक किंवा कारचा वापर करणारे अनेकजण सायकल चालवत आणि पायी चालत विद्यालयात आले होते. प्राचार्य डॉ संदेश जगदाळे, उप प्राचार्य डॉ घनश्याम साठे यांनी ‘नो व्हेईकल डे’ चे महत्व सांगितले, मार्गदर्शन केले. स्लो सायकल स्पर्धा मुले गटात विपुल रविंद्र नरवणकर (TYBCom) याने प्रथम व आलीश उल्हास साळगावकर (TYBSc) यांने द्वितीय क्रमांक पटकावला. मुली गटात सिमरन विवेक देवघरकर (FYBMS) हिने प्रथम व इफत मन्नन दिनवारे (SYBCom) हिने द्वितीय क्रमांक पटकावला. शिक्षकांमध्ये प्रा. बापू यमगार यांनी प्रथम व प्रा. रघुनाथ घालमे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.
स्लो सायकल स्पर्धेचे नियोजन करण्यात प्रा. नंदिनी जगताप, प्रा. सिद्धी साळगावकर, अंबरीश गुरव, सुरज शेठ इत्यादींनी मोलाची भूमिका बजावली. निरोगी-आरोग्यदायी आयुष्यासाठी आठवड्यातील निदान एक दिवस तरी वाहनांचा त्याग करा आणि दैनंदिन जीवनात सायकलचा वापर अधिक करा असे आवाहन यानिमित्ताने करण्यात आले आहे.