इक्बाल जमादार/खेड
हळदीच्या कार्यक्रमात लावलेला डिजे बंद करायला लावल्याच्या संशयावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. चाकू, काठी दगड, लोखंडी पाईपने मारहाण करण्यात आली. या हाणामारीत 11 जण जखमी झाले झाले असून परस्पर विरोधात तक्रारीनुसार एकूण 35 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही घटना दापोली तालुक्यातील नवानगर येथे रविवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद अशोक माने (४२, दापोली) यांनी दापोली पोलिस स्थानकात दिली.
माने यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांच्या घराशेजारी हळदीचा कार्यक्रम होता. मात्र याचवेळी त्यांच्या नातेवाईकांचे कोल्हापूर येथे निधन झाल्यामुळे ते कोल्हापूरला जात होते. त्याचवेळी तिथे पोलिस आले आणि त्यांनी डीजे बंद करायला लावला. माने यांच्यामुळेच पोलिसांनी डीजे बंद करायला लावला असा गैरसमज करून घेत एकूण २० जणांनी त्यांना मारहाण करायला सुरुवात केली. अशोक माने यांना मारहाण होत असल्याचे पाहिल्यावर त्यांचे भाऊ शिवाजी माने व भाचा चेतन नलावडे हे पुढे सरसावले. त्यांनाही मारहाण करण्यात आली.
मिथुन कुऱ्हाडे, सूरज, कमल कुऱ्हाडे, सचिन कळकुटगी, मारुती कळकुटगी, संतोष कळकुटगी, चेतन नलावडे, रमेश नलावडे, हरिश्चंद्र नलावडे, प्रणव नलावडे, रूद्र कुऱ्हाडे, समर्थ कुऱ्हाडे, मनीषा कळकुटगी, सुनील माने, परशुराम माने, महेंद्र माने, नीला माने, यल्लका कळकुटगी, साहिल नलावडे, अनिल नलावडे (सर्व राहणार नवा नगर दापोली) हे २० जण कोयती, लोखंडी पाईप, काठी, दगड घेऊन चाल करून आले. त्यांनी शिवाजी माने, चेतन नलावडे, शांता माने, केतन नलावडे, बंडू कळकुटगी अशा ५ जणांना जबर मारहाण केली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संशयित आरोपींवर भादविकलम १४३, १४७, १४८, १४९, ३२६, ३२४, ३२३, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर दुसऱ्या बाजूने चेतन नलावडे यांनी दिलेल्या तक्रारी नुसार, त्यांच्या बहिणीचे लग्न आज सोमवारी असल्यामुळे रविवारी हळदीच्या कार्यक्रमात अशोक माने, शिवाजी माने, अनाप्पा माने, लोकेश माने, दिलीप माने, सतीश माने, केतन नलावडे, चेतन नलावडे, अमोल माने, बंडू कलकुटकी, जयश्री माने, अनिता माने, सौरभ माने, अथर्व माने यांनी चाकू, काठी दगड, लोखंडी पाईप ने मारहाण केली व ठार मारण्याची धमकी दिली अशी तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी वरील १५ जणांविरोधात भादविकलम १४३, १४७, १४८, १४९, ३२६, ३२४, ३२३, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
याबाबतचा अधिक तपास दापोली पोलिस करत आहेत.