(दापोली)
दरवर्षी ३ जून जागतिक सायकल दिवस आणि ५ जून जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला जातो. मनुष्य आणि पर्यावरण यांच अतूट नातं आहे. निसर्गाशिवाय मनुष्य जीवन शक्य नाही. सायकल चालवणे केवळ पर्यावरणासाठीच चांगले नाही तर आपल्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. सायकलचं महत्त्व व आरोग्यादायी फायदे समजून सांगण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धन जनजागृतीसाठी दापोली सायकलिंग क्लब तर्फे रविवार ५ जून २०२२ रोजी सायकल फेरी काढण्यात आली. सायकल फेरी झाल्यावर आझाद मैदान दापोली येथे स्लो सायकल स्पर्धा संपन्न झाली.
या सायकल फेरीचा मार्ग आझाद मैदान दापोली – आंबेडकर चौक- कोकंबा आळी- श्री भैरीभवानी मंदीर गिम्हवणे- सोनार वाडी- तेली वाडी- एकता नगर- टांगर गल्ली- बुरोंडी नाका- आझाद मैदान असा ६ किमीचा होता. यामध्ये सर्व वयोगटातील नागरिक सहभागी झाले होते. सायकल फेरी झाल्यावर आझाद मैदानात स्लो सायकल स्पर्धा ३ गटात घेण्यात आली. यामध्ये मुलगे मोठा गटात सर्वेश देवेंद्र बागकर, आयुष मंगेश शिर्के, वेदांत राजेंद्र नाचरे यांनी, मुली मोठा गटात अनिषा संतोष लयाळ, मनश्री प्रकाश पालवणकर, रिद्धिमा सुदेशकुमार चव्हाण यांनी आणि लहान गटात संघरत्न आनंद शेळके, अनुज महेंद्र शिगवण, हेरंब मुकुंद लोंढे, ग्रिष्मा सुदेशकुमार चव्हाण यांनी नंबर काढले. या विजेत्यांना चषक, भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. भेटवस्तू म्हणून सायकल हेल्मेट, हवेचा पंप इत्यादी सायकलिंग साठी उपयोगी साहित्य देण्यात आले.
सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने सर्वांसाठी दापोली सायकलिंग क्लबमार्फत विनामूल्यपणे सायकल फेरीचे आयोजन केले जाते. या सायकल फेरीचे नियोजन करण्यात संदीप भाटकर, अंबरीश गुरव, विनय गोलांबडे, राहुल मंडलिक, झाहीद दादरकर, अमोद बुटाला, राकेश झगडे, रागिणी रिसबूड, शैलेश मोरे, उत्पल वराडकर इत्यादींनी मोलाची भूमिका बजावली. दैनंदिन जीवनात सायकलचा वापर अधिक करा आणि इतरांनाही प्रेरित करा असे आवाहनही आयोजकांनी केले आहे.