( खेड / इक्बाल जमादार )
दापोली तालुक्यातील भोपण परिसरात वीज प्रवाहित तारा हाताला लागतील एवढ्या उंचीवर येवून ठेपल्या आहेत. याकडे महावितरणचे पूर्णतः दुर्लक्ष झालेले दिसून येत आहे. या वीज वाहिन्या प्रवाहित असल्याने कोणत्याही क्षणी हात लागून प्राण गमवावे लागतील. शिवाय गाड्याही या मार्गावरून जात असल्यामुळे दुर्घटना घडू शकते. एवढी मोठी स्थिती असतानाही महावितरण याकडे दुर्लक्ष करत आहे.
शिगवण वाडी ते भोपण अशी लाईन आल्याने त्या वायरची देखरेख होत नाही. अनेक ठिकाणी वायरला वायर चिकटल्यामुळे स्पार्किंगचे प्रकारही वाढत आहेत. अनेक ठिकाणी झाडाला वायर लागून वीज पुरवठा खंडित होत असतो. प्रत्यक्ष या कामाचे मे महिन्यामध्ये देखभाल करणे गरजेचे असताना या बाबीकडे दुर्लक्ष केले आहे. शिवाय वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने उद्योगाबरोबर पिठाच्या चक्या बंद होत आहेत. परिणामी वेळेवर रोटी भाकरी मिळणे कठीण झाले आहे. वारंवार होणाऱ्या विजेच्या लपंडावामुळे नागरिकही हैराण झाले आहेत. विजेच्या खेळ खंडोबाचा या भागातील सुमारे 20 ते 25 गावाला फटका बसत असल्याचे येथील नागरिकांकडून बोलले जात आहे. या बाबीकडे त्वरित लक्ष दिले नाही तर येत्या 15 ऑगस्ट रोजी दाभिळ, पंगारी, भोपण परिसरातील ग्रामस्थ उपोषणला बसणार आहेत.