(संगलट-खेड/इक्बाल जमादार)
दापोली शहरात वाहतूक सुरक्षित व शिस्तीत व्हावी यासाठी दापोली पोलीस विभागाकडून वाहतुकीच्या विविध नियमांची कडक अंमलबजावणी केली जात आहे. शुक्रवारी दि ६ रोजी दापोली शहरात ३५ लोकांवर कारवाई करण्यात आली असून, त्यात विनापरवाना वाहन चालविणे यामध्ये १२ हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे. या वेळी विनापरवाना वाहन चालविणाऱ्याना दंडाची पावती जाग्यावर देण्यात आली.
ही कारवाई देवानंद बोरकर,भूषण सावंत, धनाजी देवकुळे, मोहन देसाई आणि होमगार्ड कर्मचारी यांचे संयुक्त माध्यमातून करण्यात आली. संध्याकाळी उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. सदर कारवाई अशीच पुढेही केली जाणार आहे असे बोरकर यांनी सांगितले.
दापोली शहरात धूम स्टाईलने वाहने चालविणाऱ्या युवकांना देखील कायद्याचा लगाम बसणे आवश्यक आहे, असे देखील या कारवाईच्या निमित्ताने दापोलीत नागरिकांनी आपले म्हणणे बोलून दाखविले. दुचाकीला फोग लाईट, हॉर्नचा कर्कश आवाज हे प्रमाण देखील दापोली शहरात वाढले आहे. त्यामूळे अशा बहादारांना देखील वचक बसणे आवश्यक आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे.
दापोली उपजिल्हा रुग्णालयासमोर भर रहदारीच्या रस्त्यावर रात्रीची ट्रॅव्हल्स गाड्यांची बेशिस्त होणारी पार्किंग आणि त्यामुळे होणारे वाद विवाद हे नित्याचे झाले आहे. त्यामुळे येथील पार्किंगवर दापोली पोलिसांनी योग्यती कारवाई करून अन्य ठिकाणी ही वाहने पार्किंग केली जावी अशी मागणी दापोलीतील नागरीक करत आहेत.