(दापोली/प्रतिनिधी)
दापोली तालुक्यातील आंजर्ले समुद्रकिनारी भंडारवाड्यालगत वाळू माफियांत दोन दिवसांपूर्वी तुंबळ हाणामारी झाली. यात अनेकजण जखमी झाले आहेत.
येथे वाळू माफियांकडून मोठ्याप्रमाणात बेकायदेशीरपणे वाळू उपसा करण्यात येतो. दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या अंधारात येथे वाळू काढायला आलेल्या गाडीवाल्यांमध्ये बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले. काहीवेळाने ही हाणामारी इतकी विकोपाला गेली की, एका गाडीवाल्याला सर्व गाडीवाल्यांनी व वाळूमाफियांनी मिळून वाळूमध्येच लाथाबुक्क्यांनी तुडवले. यामध्ये गाडीवाला गंभीर जखमी झाला. यानंतर या गाडीवाल्याने इतर वाळू माफियांवर हल्ला करून त्यांनादेखील जखमी केले.
ही हाणामारी बराच वेळ समुद्रकिनारी सुरु होती. ग्रामस्थांना याचा सुगावा लागताच काही ग्रामस्थही ही हाणामारी सोडवण्यासाठी गेले. या हाणामारीत अनेक वाळू माफिया व गाडी चालक जखमी झाले आहेत. मात्र हा सर्व चोरटा व्यवसाय असल्यामुळे याबाबत त्यांनी पोलीस स्थानकात कोणत्याहीप्रकारची तक्रार केलेली नाही. मात्र या हाणामारीची जोरदार चर्चा सुरू आहे.