(दापोली)
दापोली तालुक्यामधील नारगोली येथे फळबागेला आग लागून नुकसान केल्याप्रकरणी दोन महिलांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रंजना चांदिवडे व अनुसया भडवळकर अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारगोली येथे अचानक आग लागून सुमारे 670 काजूची झाडे जळून 6 बागायतदारांचे 2 लाख 75 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना 26 फेब्रुवारी रोजी दुपारी 1.45 वाजता घडली होती. या पकरणी दापोली पोलीस स्थानकात खबर देणारे विजय भदीरके (58,रा. नारगोली-टाळसुरे) यांना रंजना चांदिवडे व अनुसया भडवळकर यांनी बागेमध्ये आग लागल्याची माहिती दिली होती. रंजना व अनुसया यांनी ग्रामस्थांच्या मदतीने लागलेली आग आटोक्यात आणली.
या आगीत काशीराम भदीरके यांच्या काजू बागेमधील 450 झाडे जळून सुमारे 1 लाख 87 हजार 500 रुपये, रामचंद्र जागडे यांच्या बागेतील 5 झाडे जळून 21 हजार रुपये, शांताराम भडवळकर यांच्या बागेमधील 15 झाडे जळून 6 हजार 250 रुपये, धोंडू सकपाळ यांच्या बागेमधील 70 झाडे जळून 25 हजार रुपये, सुरेश जागडे यांच्या बागेमधील 50 झाडे जळून 23000 रुपये, तुकाराम कुटरेकर यांच्या बागेमधील 80 झाडे जळून 32 हजार रुपयांचे नुकसान झाले. अशाप्रकारे 6 बागायतदारांची सुमारे 670 काजूची लागती कलमे जळून 2 लाख 75 हजार रुपयांचे नुकसान झाले. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
या प्रकरणी दापोली पोलिसात आकस्मिक जळीत म्हणून नोंद करण्यात आली होती. अधिक तपास दापोलीचे पोलीस नाईक राजेंद्र नलावडे यांनी केला असता रंजना व अनुसया या आनंदी जाधव यांच्या बागेत साफसफाईचे काम करीत होत्या व बागेत मोठ्या प्रमाणात जमलेला पालापाचोळा जमीन मालकांना न विचारता किंवा त्यांची कोणतीही संमती नसतानाही कचरा जाळून ही आग पूर्णपणे विझलेली असल्याची खात्री न करता दुसरे काम करायला गेल्या व त्या आगीतील किटूळ उडून या झाडांना आग लागली व फळांचे नुकसान झाले, असे आढळून आले.
निष्काळजीपणा व हलगर्जीपणाने आग लागल्याचे प्रथमदर्शनी आढळून आल्याने दोघींवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक नलावडे करीत आहेत.