( दापोली / प्रतिनिधी )
दापोली तालुक्यामधील इनामपांगरी येथे क्षुल्लक कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना सोमवारी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास झाली. याप्रकरणी दोन्ही गटांकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून त्यानुसार दोन्ही गटांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास विजया देवघरकर (इनामपांगारी सुतारवाडी) ही काजूच्या बागेमधून काजू बी काढून परत येत असता त्यावेळी मनीषा देवघरकर उर्प श्रुती कदम ही अचानक तिच्यासमोर आली व शिविगाळ करू लागली. तेव्हा विजया देवघरकर हिने शिविगाळ का करतेस अशी विचारणा केली असता मनीषा हिने काठीने विजया व तिच्यासोबत असणारे विलास देवघरकर यांना मारहाण केली. यामध्ये विजया देवघरकर हिच्या हाताला दुखापत होऊन बोटाला पक्चर झाले. त्यानंतर मनीषा देवघरकर, चेतन कदम, साहिल वाडकर, आनंदी देवघरकर यांनीदेखील विलास देवघरकर व परशुराम देवघरकर यांना काठीने मारहाण करत व धक्काबुक्की करत शिविगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी दापोली पोलीस स्थानकात भादंवि कलम 325, 324 ,323, 50, 4, 506 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुकाळे करीत आहेत.
याप्रकरणी परस्परविरोधी तक्रार देताना मनीषा देवघरकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सोमवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान मनीषा आपला पती चेतन कदम यांच्यासोबत खेड येथून किराणा सामान घेऊन घरी इनामपांगारी येथे आली. त्यावेळी विलास देवघरकर, विजया देवघरकर, प्रथमेश देवघरकर, भावेश देवघरकर, परशुराम देवघरकर, संतोष देवघरकर, विकास निवळकर अशा सातजणांनी इनामपांगारी सुतारवाडी येथील पाण्याच्या टाकीजवळ काठीने व हाताच्या थापटाने मारहाण करण्यास सुरुवात केली. परशुराम देवघरकर याने मनीषा हिची मान धरून मारहाण केली. परशुराम देवघरकर, संतोष देवघरकर, विकास निवळकर, सुचिता देवघरकर, चंद्रकांत देवघरकर, सुजाता देवघरकर, वनिता निवळकर, प्रगती देवघरकर, वैभव देवघरकर (सर्व राहणार सुतारवाडी इनामपांगारी) यांनी फिर्यादीच्या राहत्या घरी येऊन तिला तसेच पती चेतन कदम, मुलगा साहिल वाडकर, आई आनंदी देवघरकर यांना काठीने व कोयतीने तसेच हाताच्या थापटाने मारहाण करून दुखापत केली. त्यांच्याविरुद्ध दापोली पोलीस स्थानकात भादंवि कलम 452, 354, 324 ,323 ,143, 147, 148 ,149 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार गायकवाड करीत आहेत.