( दापोली / प्रतिनिधी )
दापोलीहून पुण्याला जाणाऱ्या टेम्पो गाडीला खेर्डी-पांढरीचीवाडी येथे समोरून येणाऱ्या कारचा धक्का लागून झालेल्या किरकोळ अपघातात टेम्पो चालकाला दोघांनी टॉमीने बेदम मारहाण केली. यात गंभीर जखमी झालेल्या टेम्पो चालकावर दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी दोघा संशयितांवर दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील काळकाई कोंड पाण्याच्या टाकीजवळील प्रवीण सुरेश चव्हाण (३०) हे त्रिफळ बिया घेऊन बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास आपल्या ताब्यातील टेम्पोने पुणेकडे निघाले असता खेर्डीनजीक पांढरीचीवाडी येथे समोरून येणाऱ्या कारचा आरसा टेम्पोच्या मागील साईड गार्डला लागला. त्यामुळे चालक प्रवीण चव्हाण यांनी आपला टेम्पो रिव्हर्स घेऊन कारनजीक आणला असता कारमधील बिलाल हमीद रखांगे आणि नदीम हमीद रखांगे (खोंडा-दापोली) यांनी कारमधून खाली उतरून चालक प्रवीण चव्हाण याला टॉमीच्या सहाय्याने मारहाण करत हाताने मारहाण केली. यामध्ये चालक चव्हाण हे गंभीर जखमी झाले.